‘केडीएमसी क्षेत्रात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी’
By admin | Published: June 23, 2017 05:40 AM2017-06-23T05:40:54+5:302017-06-23T05:40:54+5:30
प्लास्टिक पिशव्यांना बंदी घाला ही वाढती मागणी पाहता १५ जुलैपासून कल्याण डोंबिवलीत सर्वच प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालणार
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : प्लास्टिक पिशव्यांना बंदी घाला ही वाढती मागणी पाहता १५ जुलैपासून कल्याण डोंबिवलीत सर्वच प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालणार अशी घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी डोंबिवलीतील कार्यक्रमात केली.
घनकचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी उपाय सुचविण्याच्या अनुषंगाने शहरातील काही सामाजिक संस्था, तज्ज्ञ, नगरसेवक आणि अधिकारी यांची एकत्र बैठक महापौर देवळेकर यांनी सावित्रीबाई फुले कलामंदिरात घेतली. या बैठकीला वेंगुर्ला नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यासह उपमहापौर मोरेश्वर भोईर, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, सभागृहनेते राजेश मोरे, डॉ. उल्हास कोल्हटकर, प्रवीण दुधे, रूपाली शाईवाले, डॉ नरेशचंद्र, अर्पणा कवी आदी उपस्थित होते. कोकरे यांनी मार्गदर्शन केले.
ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण घरात करण्यास सुरूवात झाली. ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती तर सुक्या कचऱ्यात वेगवेगळे घटक असल्याने सात प्रकारचा कचरा गोळा करण्यास सुरूवात झाली. तर या कचऱ्यातील काही घटकांचा रिसायकलिंगसाठी विक्री करून त्यातून उत्पन्न मिळवले जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.