पावसाळी पिकनिकवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:05 AM2019-07-07T00:05:08+5:302019-07-07T00:05:29+5:30

गेल्या वर्षीही जिल्हा प्रशासनाने अशा प्रकारचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावर ओरड झाल्यावर मागे घेण्यात आला होता.

Ban on the rainy picnic | पावसाळी पिकनिकवर बंदी

पावसाळी पिकनिकवर बंदी

Next

वासिंद / बदलापूर : पावसाळा सुरू झाला की, जिल्ह्यातील पर्यटन म्हणा किंवा धबधब्याच्या ठिकाणी चिंब भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने जातात. मात्र, अतिउत्साही पर्यटकांमुळे अपघात होऊन प्रसंगी मृत्यू होतात. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. त्यामुळे पर्यटक नाराज झाले आहेत. जेथे धबधबे आहेत, तेथे पोलीस बंदोबस्त, जीवरक्षक ठेवावे म्हणजे अपघात होणार नाही किंवा झाल्यास तत्काळ मदत मिळेल, असे मत पर्यटकांनी व्यक्त केले. मूठभर अतिउत्साही पर्यटकांमुळे निखळ आनंद घेण्यासाठी जाणाऱ्यांच्या उत्साहावर पाणी फिरले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


गेल्या वर्षीही जिल्हा प्रशासनाने अशा प्रकारचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावर ओरड झाल्यावर मागे घेण्यात आला होता. परदेशात अनेक ठिकाणी पर्यटनस्थळी सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या गेल्या आहेत. मग, आपल्याकडे तशा का राबवल्या जात नाही, असा सवाल पर्यटकांनी विचारला आहे. उपाययोजना, तेथील देखभालीसाठी शुल्क आकारा, आम्ही देऊ, असेही पर्यटकांचे म्हणणे आहे.
कोंडेश्वर व कुंडी धबधब्यांत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील इतर धबधब्यांत अशा अनेक दुर्दैवी घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटक, तरुण मुले व इतर नागरिकांना धबधब्यांची ओढ लागते. शहरी, ग्रामीण भागातील काही अतिउत्साही पर्यटक व काही मद्यपी तरु ण हे पोहण्यासाठी पाण्यात उतरतात. पाण्याचा अंदाज येत नसल्याने तसेच काही नागरिक पाय घसरून, तोल जाऊन आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक उपाययोजना करून अथवा धोक्याची सूचना देऊनही असे दुर्दैवी प्रकार होतात.


जिल्ह्यातील येऊर, कळवा-मुंब्रा, घोडबंदर, रेतीबंदर, धबधबे, उत्तन सागरी किनारा, कल्याण तालुक्यातील कांबा, पावशेपाडा, खडवली नदी, चौपाटी, गणेशघाट, मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट, पाडाळे, सिद्धगड, सोनावळे लेण्या, डोंगरन्हावे, गोरखगड, नाणेघाट, धसई डॅम, आंबेटेंबे, नाणेघाट आदी पर्यटनस्थळावरील धबधबे. शहापूरमधील भातसा धरणस्थळ, अशोका धबधबा, कुंडन, दहागाव, कळंबे, सापगाव चेरवली, खराडे नदीकिनारा, माहुली किल्ला पायथा, आजा पर्वत, अंबरनाथमधील कोंडेश्वर, धामणवाडी, सारवाडी, दहिवली, मळीचीवाडी आदी धबधब्यांच्या ठिकाणी खबरदारी म्हणून जिल्हाधिकाºयांनी बंदी घातली आहे.


माळशेजघाटात दरडी कोसळण्यास सुरुवात झाल्यानंतर प्रशासनाने धबधब्यांच्या दोन किमी परिघांत पर्यटकांना जाण्यास मनाई केली आहे. यामुळे धबधब्याखाली चिंब भिजण्यास पर्यटकांना मुकावे लागणार आहे. बंदीपेक्षा प्रशासनाने पोलिसांकरवी कडेकोट बंदोबस्त लावून वाहनांची कडक तपासणीसह मद्यपींचा बंदोबस्त केला अनुचित प्रकार घडणार नाहीत. मात्र, सरसकट पर्यटकांना बंदी म्हणजे त्यांच्या आनंदावर विजरण टाकणारी आहेच शिवाय स्थानिकांच्या तात्पुरत्या रोजगणारावर गदा आणणारी आहे.


कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी काही कालावधीसाठी जिल्हाधिकारी यांचा बंदीआदेश योग्य आहे. तसेच पर्यटकांनीही निसर्गाच्या सान्निध्यात फिरताना मनमोकळा आनंद घेतला पाहिजे. परंतु, त्या ठिकाणच्या धोक्यांचा काळजीपूर्वक विचार करून पाऊल टाकले पाहिजे.
- सुजाण वडके, सदस्य, माहुली निसर्गसेवा न्यास

निसर्गाला हानी पोहोचेल अथवा स्वत:बरोबर इतरांना त्रास होईल, असे न करता धबधबे व पावसाचा आनंद घेत सुरक्षितता पाहणे गरजेचे आहे.
- सचिन पाटील, पर्यटक


कोंडेश्वर येथे जाण्यास पर्यटकांना मनाई
बदलापूर : बदलापूर शहराला लागून असलेल्या कोंडेश्वरसह तालुक्यातील लहानमोठ्या धबधब्यांवर पर्यटकांना बंदी घालण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला आहे. काही बेजबाबदार पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे धबधब्यांवर बुÞडून मृत्यू होण्याचे प्रकार घडत असल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. धबधब्यांच्या ठिकाणी सुरक्षा देण्याऐवजी त्यावर बंदी घातल्याने पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे.

Web Title: Ban on the rainy picnic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.