बंदीवरून दोन यंत्रणांमध्ये जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:57 AM2018-12-07T00:57:40+5:302018-12-07T00:57:44+5:30
केडीएमसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मध्यंतरी प्लास्टिक संकलनाची संयुक्त कार्यवाही सुरू करण्यात आली होती.
- प्रशांत माने
कल्याण : केडीएमसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मध्यंतरी प्लास्टिक संकलनाची संयुक्त कार्यवाही सुरू करण्यात आली होती. सद्य:स्थितीला ही मोहीम पूर्णपणे बंद पडली आहे. केडीएमसीकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला असून या मंडळाने नाकर्तेपणाबाबत महापालिकेला नोटीस बजावली आहे. या मुद्यावर दोन्ही यंत्रणांमध्ये जुंपली असून महापालिकेकडून कार्यवाही होत नसल्याने केडीएमसीच्या हद्दीत प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू असल्याचा आरोप मंडळाने केला आहे.
२३ जूनपासून राज्यभरात प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केडीएमसीने स्थानिक पातळीवर प्रारंभी नऊ ठिकाणी प्लास्टिक केंद्रे उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले; परंतु प्रत्यक्षात चारच ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्यात आली. यात कल्याणमधील आधारवाडी आणि सुभाष मैदान, पूर्वेकडील ड प्रभाग कार्यालय आणि डोंबिवलीतील सूतिकागृहाचा परिसर यांचा समावेश होता. सद्य:स्थितीला केवळ आधारवाडी येथीलच संकलन केंद्र सुरू आहे. महापालिकेने काही प्रभागांमध्ये कचरा गोळा करण्याचे कंत्राट दिले असून त्यांच्या माध्यमातूनच ओला आणि सुका कचऱ्यासह प्लास्टिक संकलन केले जाणार आहे. एकीकडे ठोस कृतीअभावी प्लास्टिकबंदीचा बोºया वाजल्याचे चित्र सर्वत्र दिसत असताना केडीएमसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने सुरू केलेल्या प्लास्टिक संकलन करण्याच्या विशेष मोहिमेलादेखील एक प्रकारे खोडा बसला आहे. केडीएमसीकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे. संबंधित विभागाची कारवाई औद्योगिक क्षेत्रात सुरू असताना महापालिका क्षेत्रातील प्रभागस्तरावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने केडीएमसीकडून कोणतीही मदत मिळत नसल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी दिली. दोन महिन्यांपूर्वीच प्लास्टिकबंदी मोहिमेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी महापालिकेला शहराच्या विविध भागांमध्ये फलक लावण्यासंदर्भात सांगण्यात आले होते. त्याबाबतही कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नसल्याकडे दुर्गुळे यांनी लक्ष वेधले. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त, सहायक आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य निरीक्षक यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचेही दुर्गुळे यांचे म्हणणे आहे. आमच्या विभागाकडून कारवाई सुरू आहे, पण केडीएमसीच्या नाकर्तेपणामुळे कल्याण-डोंबिवली शहरांत प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढल्याचा आरोप दुर्गुळे यांनी केला. याप्रकरणी केडीएमसीला दोनच दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
>नोटीसबाबत माहिती नाही
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसबाबत मला काहीही माहीत नाही. केडीएमसीची कार्यवाही स्वतंत्रपणे सुरू आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर यापूर्वी आम्ही संयुक्त कार्यवाही केलेली आहे. यापुढेही आमची सहकार्याचीच भूमिका राहील, असे केडीएमसीचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले.