गाडगीळांचा बंडू अन् नेमाडेंचा सांगवीकर माॅलमध्ये भेटणार; ठाण्यातील कोरम मॉलमध्ये आज वाचकांना पर्वणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 06:06 AM2024-02-24T06:06:12+5:302024-02-24T06:06:24+5:30
लोकमत माध्यम समूहाने आयोजित केलेल्या ठाणे साहित्य महोत्सवात शनिवार, २४ ते सोमवार, २६ फेब्रुवारीदरम्यान कोरम मॉलमध्ये पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. मराठी सारस्वतामधील अनेक लोकप्रिय व्यक्तिरेखांचा तीन दिवस ठाण्यात मुक्काम असणार आहे.
ठाणे : गंगाधर गाडगीळ यांचा खट्याळ बंडू आणि ‘कोसलाकार’ भालचंद्र नेमाडे यांचा पांडुरंग सांगवीकर यांनी ठाण्यातील कोरम मॉलमधील मोक्याच्या जागा अडविल्या असून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या तुम्हा लक्षावधी वाचकांची उद्या, शनिवारी सकाळी ११ वाजेपासून पुढील तीन दिवस ते आतुरतेने वाट पाहणार आहेत.
लोकमत माध्यम समूहाने आयोजित केलेल्या ठाणे साहित्य महोत्सवात शनिवार, २४ ते सोमवार, २६ फेब्रुवारीदरम्यान कोरम मॉलमध्ये पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. मराठी सारस्वतामधील अनेक लोकप्रिय व्यक्तिरेखांचा तीन दिवस ठाण्यात मुक्काम असणार आहे.
जयवंत दळवींचा हातोडाधारी ठणठणपाळ सुरक्षा व्यवस्थेला चकमा देत मॉलमध्ये दाखल झालाय, तर विजय तेंडुलकरांचा सखाराम चंपासह भटकतोय. धर्म, अध्यात्म, व्रत-वैकल्यांच्या सात्त्विक ग्रंथसंपदेने आणि वेगवेगळ्या पाककलांच्या अद्भुत रसमाधुर्याने ओतप्रोत भरलेल्या पुस्तकांनीही या प्रदर्शनाला भेट देणारे बौद्धिक तृप्तीचा ढेकर देणार आहेत.
अस्सल साहित्यकृतींची मेजवानी
मानवी वर्तनाच्या खोल खोल अंधाऱ्या विहिरीत सतत शोध घेणारे ख्यातनाम साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या ‘सात पाटील कुलवृत्तांत’, ‘दु:खाचे श्वापद’, ‘अरण्यरुदन’ अशा वाचकप्रिय साहित्यकृतींनी प्रदर्शनाचे कप्पे अडवलेत. २० व्या शतकाच्या उत्तरार्धातील माणसाच्या जगण्यातील परिवर्तनाला आलेख मांडणारे आणि मानवी संवेदनांची शब्दरांगोळी चितारणारे लेखक राजन गवस यांची ‘चौंडक’, ‘धिंगाणा’, ‘तणकट’ वगैरे साहित्यकृतींना वाचकांची प्रतीक्षा आहे. राजन खान, श्याम मनोहर, सदानंद देशमुख, अशा असंख्य लोकप्रिय लेखकांची ‘आत्ता तू मोठा हो’, ‘एक लेखक खर्च झाला’, ‘खेकसत आय लव यू म्हणणे’, ‘खूप लोक आहेत’, ‘बारोमास’, ‘तहान’, ‘अंधारवड’ आदी ग्रंथसंपदा वाचकांकरिता उपलब्ध होणार आहे.
२० ते २५ प्रकाशन संस्थांचा सहभाग
nमौज, पॉप्युलर, मेहता, रोहन, ज्योत्स्ना, मॅजिस्टिक, मनोविकास, मनोरमा, डायमंड, मधुश्री, कृष्ण अशा २० ते २५ प्रकाशन संस्थांच्या हजारो पुस्तकांनी कोरम मॉलमधील कोपरा अन् कोपरा सजला आहे.
nकोरे कपडे, परफ्युम्स, ब्रँडेड लेदर शूज, सिझलर्स, पावभाजी, कॉफी यांच्या गंधाने तृप्त होणाऱ्या मॉलमधील ग्राहकांच्या नाकपुड्यांभोवती नव्याकोऱ्या पुस्तकांचा मॉलमध्ये कधीच अनुभवास न आलेला गंध रुंजी घालणार आहे.