उल्हासनगरातून बांगलादेशी दाम्पत्याला अटक, शहर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
By सदानंद नाईक | Updated: January 4, 2025 20:17 IST2025-01-04T20:17:42+5:302025-01-04T20:17:53+5:30
दोघेही बांगलादेशी असल्याचे उघड झाले असून महिला वेटर तर तिचा पती फेरीवाल्याचा धंदा करीत होते.

उल्हासनगरातून बांगलादेशी दाम्पत्याला अटक, शहर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-४, आशेळेगाव न्यू साईनाथ कॉलनी येथून एका बांगलादेशी दाम्पत्याला शहर गुन्हे अन्वेषन विभागाने शुक्रवारी अटक केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे यांना गुप्त बातमीदाराद्वारे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशेळेगाव येथील न्यू साईबाबा कॉलनी, स्वामी सर्वानंद आश्रमच्या मागे बांगलादेशी नागरिक राहत असल्याचे माहिती मिळाली. विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या पथकाने दोन पंच, दुभाषिक सोबत घेऊन घटनास्थळी जाऊन चौकशी करून मीना मुजिद खान व तिचा पती इमोन उर्फ मेहमूद खान असद खान यांना ताब्यात घेतले. ते दोघेही बांगलादेशी असल्याचे उघड झाले असून महिला वेटर तर तिचा पती फेरीवाल्याचा धंदा करीत होते.
बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाल्यावर, दोन पंचांसमक्ष सविस्तर पोलिसांनी पंचनामा केला. पारपत्र (भारतात प्रवेश) अधिनियम १९२० चे कलम ३,४ सह विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १३,१४(अ)(ब) अन्वये कायदेशीर कारवाईसाठी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस करीत आहेत.