लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील बँक खाते व्यवहारांवर राहणार करडी नजर!
By सुरेश लोखंडे | Updated: March 14, 2024 21:27 IST2024-03-14T21:20:29+5:302024-03-14T21:27:09+5:30
ठाणे : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूकीच्या पूर्व तयारीचे कामकाज हे विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी कार्यवाही ...

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील बँक खाते व्यवहारांवर राहणार करडी नजर!
ठाणे : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूकीच्या पूर्व तयारीचे कामकाज हे विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. या निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका व खाजगी बँकांकडून रोख रक्कम रेमिटन्स द्वारे आणावयाची असेल किंवा पाठवायची असेल, रोखीचे मोठे व्यवहार होत असतील तर त्याकरिता संबंधित बँकेच्या प्रत्येक शाखेच्या शाखा प्रबंधकाना एक क्यूआर कोड देण्यात येणार आहे.
त्याकरिता प्रत्येक बँकेने त्यांच्या मुख्य शाखेतून एक नोडल ऑफिसर ची नेमणूक करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मुख्य बँकेतील नोडल ऑफिसर चे युजर आयडी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तयार करून दिले जाणार आहेत .त्या नोडल ऑफिसरने त्यांच्या बँकेच्या सर्व शाखा प्रबंधकाचे यूजर आयडी तयार करणे आवश्यक आहे, कारण प्रत्येक शाखेची कॅश मुव्हमेंट होत असताना त्या शाखेकडून क्यू आर कोड जनरेट होणे अत्यावश्यक आहे.
क्यू आर कोड नसताना जर कॅश रेमिटन्स केली आणि ती कॅश निवडणूक अधिकाऱ्याकडून पकडण्यात आली, तर त्याच्यावर आयोगाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार ठाणे जिल्हयातील सर्व बँकाकडून होणाऱ्या व्यवहारांची माहिती आयोगाकडे सादर करण्याबाबतची कार्यवाही करण्याकरिता जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नागेंद्र मंचाळ यांची जिल्हास्तरीय बँक समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सर्व बँकांनी त्यांच्याकडील समन्वय अधिकार्यांची नियुक्ती करून तसे जिल्हाधिकारी कार्यालयास तात्काळ कळवावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी सूचित केले आहे.