ठाण्यात धावत्या रिक्षामध्ये तरुणीचा विनयभंग करणा-यास अटक: चितळसर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 04:51 PM2017-12-07T16:51:10+5:302017-12-07T17:04:33+5:30
वर्षभरापूर्वी तीन हात नाका येथून बसलेल्या तरुणीचा एका रिक्षा चालकाने विनयभंग केल्याची घटना घडली होती. आता सहप्रवाशानेही धावत्या रिक्षात विनयभंग केल्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ठाणे : धावत्या रिक्षामध्ये सहप्रवासी म्हणून बसलेल्या बँक कर्मचारी तरुणीचा विनयभंग करणा-या विलास विशे (२९, रा. शहापूर, जिल्हा ठाणे) याला चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
हे दोघेह ६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानक येथून शेअर रिक्षामध्ये बसले होते. वसंतविहार येथील पोस्ट कार्यालयात तर ती त्याच परिसरातील एका बँकेत नोकरीला आहे. रिक्षा माजीवडा येथून टर्न घेऊन वसंतविहारकडे जात असतांना त्याने तिचा विनयभंग केला. तिने आरडाओरडा केल्यानंतर वसंतविहार येथे आल्यावर काही नागरिकांनी पकडून त्याला चितळसर पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला तात्काळ अटक केल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, आपल्याकडून हा प्रकार अनावधानाने झाल्याचा दावा या पोस्ट कर्मचा-याने केला. तसेच हा कर्मचारी चांगल्या चारित्र्याचा असल्याचा दावाही काही महिलांनी करीत त्याला सोडण्याची मागणी पोलिसांकडे केली. मात्र, कायदेशीर करुन हा अधिकारी न्यायालयाचा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
.......................
धावतया रिक्षातील हा तिसरा प्रकार
धावत्या रिक्षामध्ये दोन वर्षापूर्वी स्वप्नाली लाड या तरुणीसोबत रिक्षा चालकानी अश्लील चाळे करण्याचा प्रकार केला होता. त्यावेळी तिने धावत्या रिक्षातून उडी घेऊन या प्रकाराला विरोध केला होता. त्यानंतर वर्षभरापूर्वीही ज्ञानेश्वरनगर येथील एका रिक्षा चालकाने तीन हात नाका येथून बसलेल्या एका तरुणीचा विनयभंग केला होता. नौपाडा पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर मात्र चोरीच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे त्याने मान्य केले होते. या पार्श्वभूमीवरच या तरुणीनेही तात्काळ आरडाओरडा करुन या तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे बोलले जात आहे.