ठाण्यात बँक कर्मचा-यांनी राबविले स्वच्छता अभियान: नौपाडयातील विविध भागांमध्ये साफसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 10:35 PM2018-01-21T22:35:48+5:302018-01-21T22:46:05+5:30
सामाजिक बांधिलकी जपत ठाण्याच्या सुमारे ७० बँक कर्मचारी अधिका-यांनी एकत्र येत नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रात स्वच्छता अभियान राबविले.
ठाणे: महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने देशभर राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानामध्ये स्टेट बँक आॅफ इंडियाच्या ठाण्यातील ६० ते ७० कर्मचा-यांनी सहभाग घेतला. या स्वच्छता पंधरवडयानिमित्त नौपाडा प्रभागातील विविध भागांमध्ये अधिका-यांसह कर्मचा-यांच्या चमूने शनिवारी दिवसभर स्वच्छता अभियान राबविले.
बँकेच्या वतीने संपूर्ण महाराष्टÑ आणि गोवा राज्यात १६ ते ३१ जानेवारी २०१८ दरम्यान हे अभियान राबविण्यात येत आहे. ठाण्यात हरिनिवास सर्कल, नौपाडा पोलीस ठाणे परिसर आणि गोखले रोड भागात राबविलेल्या या उपक्रमात बँकेच्या ठाणे परिमंडळाचे उपमहाव्यवस्थापक जी. अप्पाराव, सहायक महाव्यवस्थापक रविंद्र गुरव, गणेशकुमार तिवारी याशिवाय अनिल वाणी, अनंत पाटकर, संतोष वाकडे , ए. एन. बेग, कैलाश खोत, प्रकाश सांगळे, संदीप लोहकरे आदींसह बहुसंख्य कर्मचारी अधिका-यांनी सहभाग घेतला. ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि नौपाडा पोलिसांनीही बँक कर्मचा-यांना या अभियानात मोलाचे सहकार्य केल्याचे कर्ज विभागाचे व्यवस्थापक युवराज चौधरी यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भास्कर शिंदे, सुभाष ठाकूर आणि युवराज चौधरी यांनी विशेष मेहनत घेतली.
सामाजिक बांधीलकी
बँक प्रशासनाने यापूर्वीही गांधी जयंती सप्ताहाच्या दरम्यान शहरात स्वच्छता अभियान राबविले. तर सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने पालिका शाळांसाठी पंखे तसेच वॉटर प्युरिफायरचेही मोफत वाटप केल्याचे बँकेच्या वतीने सांगण्यात आले.