बँकेला कोटीचा गंडा घालणारे दोघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:34 AM2018-04-09T02:34:23+5:302018-04-09T02:34:23+5:30
खोटी नावे व कागदपत्रांच्या आधारे गृहकर्ज काढून पंजाब नॅशनल व विजया बँकेला एक कोटी १२ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीतील दोघा आरोपींना नवघर पोलिसांनी अटक केली.
मीरा रोड : खोटी नावे व कागदपत्रांच्या आधारे गृहकर्ज काढून पंजाब नॅशनल व विजया बँकेला एक कोटी १२ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीतील दोघा आरोपींना नवघर पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे खोट्या नावाने काढलेल्या आधार ओळखपत्रातील बोटांच्या ठशांमुळे हा घोटाळा उघड झाला.
नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर असलेल्या कॉर्पोरेशन बँकेचे व्यवस्थापक सीताराम प्रसाद यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. सत्येन यशवंत पडवळ (४२, रा. सूरज टॉवर, उड्डाणपूल, नयानगर) व निमा भावेश पटेल (४४, रा. न्यू म्हाडा कॉलनी, शांती गार्डन मीरा रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस आणखी चार आरोपींचा शोध घेत आहेत.
सत्येन पडवळ याने सुकेश गोपाळ कंडेरा व संजय शिवाजी सावंत या नावाने बनावट खाती उघडली होती. सुकेशच्या नावाने पंजाब नॅशनल बँकेतून ६४ लाख ६१ हजारांचे गृहकर्ज घेतले. तर निमा पटेल हिने हेमा राजेश कपाडिया व मेहरबानो अन्वर कब्बानी अशा दोन खोट्या नावांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकांमध्ये खाती उघडली होती. तिने हेमाच्या नावाने भांडुपच्या विजया बँकेच्या शाखेतून ४८ लाख रुपयांचे गृहकर्ज काढले. दोन्ही गृहकर्जे बनावट कागदपत्रांच्या आधारावर काढण्यात आली. निमा हिने आपल्या हेमा नावाच्या खात्यातून ४८ लाख रुपये जम्मू काश्मीर बँकेतील मेहरबानो नावाच्या बनावट खात्यात आरटीजीएसने वळते केले. मेहरबानोच्या खात्यातील १५ लाख रुपये सुकेश खंडेरा या नावाच्या खात्यावर टाकले.
सत्येन पडवळ जेव्हा निमासोबत सुकेश या नावाच्या खात्यातून १५ लाख रुपये काढण्यासाठी कॉर्पोरेशन बँकेत गेला, तेव्हा रक्कम मोठी असल्याने त्याच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बोटांचे ठसे बँकेने पडताळणीसाठी घेतले. त्यावेळी खाते सुकेशचे असताना बोटांचे ठसे मात्र संजय सावंत या नावाच्या व्यक्तीचे असल्याचे बँक कर्मचाºयांना आढळून आले. त्यांनी लागलीच याची माहिती नवघर पोलिसांना दिली.
पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश कुचेकर व सहकाºयांनी तपास करत आरोपी सत्येन उर्फ सुकेश उर्फ संजय व निमा उर्फ हेमा उर्फ मेहरबानो या दोघांना अटक केली.
या आरोपींनी न्यू इंडिया को.आॅप. बँक, बॅसिन कॅथलिक बँक, शामराव विठ्ठल सहकारी बँक, जम्मू काश्मिर बँक व कॉर्पोेरेशन बँकेत खोट्या नावांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे खाती उघडल्याचे दिसून आले. त्यासाठी गुमास्ता परवाना, आधारचे ओळखपत्र बनावट कागदपत्रांनी बनवले. मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, गृहकर्जासाठी लागणारी कागदपत्रे आदीही बनावट बनवली. पोलिसांनी त्यांच्याकडील पासबुक, चेकबुक जप्त केली आहेत.