कर्जवसुली न करण्याबाबत बँकांना समज द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:44 AM2021-04-28T04:44:04+5:302021-04-28T04:44:04+5:30
ठाणे : काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता एप्रिलमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आले आहे. मात्र, या बिकट परिस्थितीतही जिल्ह्यातील बँका कर्जवसुलीसाठी ...
ठाणे : काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता एप्रिलमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आले आहे. मात्र, या बिकट परिस्थितीतही जिल्ह्यातील बँका कर्जवसुलीसाठी तगादा लावत आहेत. त्यामुळे या बँकांना समज देण्याची मागणी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदनद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे- पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली.
लाॅकडाऊनच्या काळात अर्थचक्र मंदावल्यामुळे नोकरी, धंद्यासह व्यवसाय महिनाभर ठप्प झाला आहे. त्यामुळे घरखर्च भागवायचा की, बँकांचे कर्जहप्ते फेडायचे, अशी विवंचना नागरिकांपुढे आहे. मात्र, याबाबत देणे-घेणे नसलेल्या बँका आणि त्यांचे प्रतिनिधी कर्जवसुलीसाठी तगादा लावून कर्जदारांना धारेवर धरत आहेत. या बँकांना समज देऊन कर्ज वसूल न करण्याचा आदेश देण्यासाठी मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले.
बँकांचे वसुली प्रतिनिधी असभ्य भाषेत बोलून नागरिकांची मानहानी करीत आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांना कामावर जाणे शक्य झालेले नाही. त्यामुळे वेतन मिळणे अशक्य आहे. अशावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून बँकांना कायद्याचे उल्लंघन न करता सामंजस्याने प्रकरण हाताळण्याची विनंती मनसेने निवेदनाद्वारे केली आहे, तसेच सध्या सर्व व्यवहार ऑनलाइन सुरू असल्याने मोबाइल, टॅब, कॉम्प्युटर आदी वस्तू अत्यावश्यक बनल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा मोबाइल हाताळताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी लॉकडाऊन काळात मोबाइलची दुकाने सुरू ठेवण्याची मुभा द्यावी, अशी विनंतीही जाधव यांनी केली.
-------- फोटो आहे