बंदींचे कलाकुसरयुक्त फर्निचर!, कारागृहातील उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 04:27 AM2018-06-14T04:27:46+5:302018-06-14T04:27:46+5:30
साचेबद्ध फर्निचर बनवणाऱ्या ठाणे मध्यवर्ती कारागृहाने डिझायनिंग फर्निचर बनवून देण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. यातून सर्वसामान्यांनादेखील आवडीचे कलासुसरयुक्त फर्निचर बनवून घेता येणार आहे. त्यामुळे ‘आॅर्डर द्या आणि बनवून घ्या आपल्या आवडीचे डिझायनिंग फर्निचर’ हा वेगळा उपक्रमच प्रशासनाने सुरू केला आहे.
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे - साचेबद्ध फर्निचर बनवणाऱ्या ठाणे मध्यवर्ती कारागृहाने डिझायनिंग फर्निचर बनवून देण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. यातून सर्वसामान्यांनादेखील आवडीचे कलासुसरयुक्त फर्निचर बनवून घेता येणार आहे. त्यामुळे ‘आॅर्डर द्या आणि बनवून घ्या आपल्या आवडीचे डिझायनिंग फर्निचर’ हा वेगळा उपक्रमच प्रशासनाने सुरू केला आहे.
सध्या कारागृह विभागाच्या भायखळा येथील विश्रामगृहासाठी डिझायनिंग फर्निचर बनवण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्रशासनाने ‘लोकमत’ला दिली. ठाणे मध्यवर्ती कारागृहातील फॅक्टरीमध्ये सुतारकाम, शिवणकाम, पॉवरलूम, लॉण्ड्री, बेकरी हे विभाग आहेत. सुतारकाम विभागात फर्निचर बनवण्याचे काम सुरू असून, या विभागाचे वार्षिक उत्पन्न ५३ लाखांच्या आसपास जाते. दरमहा एक लाख ६० हजारांचे टार्गेट दिलेले आहे. परंतु, चार लाखांच्या आसपास म्हणजेच अडीचपट उत्पन्न दरमहिन्याला मिळत असल्याची माहिती कारागृहाचे सुतारकाम निर्देशक जयंत प्रभू यांनी दिली. या विभागात बनवल्या जाणाºया वस्तू कारागृहाबाहेरील विक्री केंद्रातदेखील ठेवल्या जातात. त्यातून फर्निचर बनवून घेण्याच्या आॅर्डर बहुतांशी या शासकीय कार्यालयाकडून असतात, असेही त्यांनी सांगितले.
एखाद्या डिझायनरकडून फर्निचरचे डिझायनिंग आणून दिल्यास हुबेहूब फर्निचर कारागृहातील सुतार विभागात बनवून दिले जाणार आहे. या विभागात २४ बंदी काम करतात. महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांच्या कार्यालयासाठी प्रायोगिक तत्त्वावर डिझायनिंग फर्निचर बनवण्यात आले होते. ते पसंत पडल्याने आता कारागृह विभागाच्या विश्रामगृहासाठीही फर्निचर बनवले जात आहे. यात टेबल, फुलदाणी, पलंग, नाइट लॅम्प, टी पॉय, साइड टेबल, सेंटर टेबल अशा विविध वस्तू बनवल्या जात आहेत.