मुंबई ठाण्यातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक; कासारवडवली पाेलिसांची कारवाई
By जितेंद्र कालेकर | Updated: July 18, 2023 18:47 IST2023-07-18T18:47:02+5:302023-07-18T18:47:18+5:30
कासारवडवली, घाेडबंदर राेड परिसरात हाणामारीसह गंभीर स्वरुपाच्या कारवाया केल्याने किरण याच्याविरुद्ध कासारवडवली पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

मुंबई ठाण्यातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक; कासारवडवली पाेलिसांची कारवाई
ठाणे : ठाण्यासह मुंबई उपनगर जिल्हयातून हद्दपार केलेल्या किरण अच्युत भुरे ऊर्फ बाळा (२१, रा.कोळेगांव, डोंबिवली पूर्व, ठाणे) याला ठाणे शहरात फिरतांना पुन्हा अटक केल्याची माहिती कासारवडवली पाेलिसांनी मंगळवारी दिली. त्याच्याविरुद्ध कलम १४२ नुसार गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
कासारवडवली, घाेडबंदर राेड परिसरात हाणामारीसह गंभीर स्वरुपाच्या कारवाया केल्याने किरण याच्याविरुद्ध कासारवडवली पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांना आळा बसण्यासाठी परिमंडळ पाच वागळे इस्टेटचे पाेलिस उपायुक्त विनय राठाेड यांनी त्याला मुंबई ठाण्यातून हद्दपार करण्याचे आदेश १३ फेब्रुवारी २०२३ राेजी दिले हाेते. मात्र, या मनाई आदेशाचा भंग करुन ताे कासारवडवली भागात माेकाट फिरत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्याच आधारे १७ जुलै २०२३ राेजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील घाेडबंदर राेडवरील डोंगरीपाडा भागातून त्याला कासारवडवली पाेलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.