कळव्यात रंगतोय बॅनर वॉर; राष्ट्रवादी विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना आमने-सामने
By अजित मांडके | Published: January 30, 2023 05:20 PM2023-01-30T17:20:52+5:302023-01-30T17:21:29+5:30
आता राष्ट्रवादी विरुध्द बाळासाहेबांची शिवसेना यांच्या बॅनरबाजीवरुन कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाण्यातील कळवा भागात आता राष्ट्रवादी विरुध्द बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात जोरदार बॅनर वॉर रंगल्याचे चित्र दिसत आहे. रविवारी कळव्यात नगरसेवकांनो विकले जाऊ नका नाहीतर गद्दार ठराल अशा आशयाचे बॅनर झळकले होते. त्याला प्रतिउत्तर म्हणून आता नरेंद्र शिंदे यांच्या नावे लागलेल्या बॅनरवर आधी लागलेल्या बॅनरला जणू उत्तर किंवा प्रतिटोलाच हाणल्याचे दिसत आहे. या बॅनरवर लबाड बोका ढोंदर करतोय, करुन करुन भागले आणि प्रवचनाला लागले अशा आशयाचा बॅनर लागला गेला आहे. यातून आता राष्ट्रवादी विरुध्द बाळासाहेबांची शिवसेना यांच्या बॅनरबाजीवरुन कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे.
मागील काही दिवसापासून राष्ट्रवादीचे नगरसेवक फुटणार असल्याची चर्चा ठाण्याच्या राजकारणात सुरु आहे. त्यातही काही नगरसेवकांनी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतल्या जात आहेत. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीव्ट करीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना एक कोटीचे आमीष दाखविले जात असल्याचा गंभीर आरोप केला होता.
या आरोपानंतर रविवारी कळवा आणि आजूबाजूच्या परिसरात याच विषयाला धरत काही बॅनर झळकले. या बॅनरवर खोका बोका नगरसेवकांनो स्वत:ला विकू नका, महाराष्ट्राच्या राजकारणात खोका नावाची किड महाराष्ट्राचे राजकीय संस्कार उध्वस्त करुन गेली. ही किड आता कळवा - मुंब्य्रात आली आहे. नगरसेवकांनो आता त्याच्यापासून लांब रहा कळवा - मुंब्य्रातील जनता तुमची गद्दारी कधीच माफ करणार नाही. अशा आशय त्या बॅनवर होता, तर त्याच्या खाली रविंद्र पोखरकर यांचे नाव होते.
कळवा भागात लागलेल्या बॅनरला आता उत्तर किंवा टोला देण्यात आला असून सोमवारी नरेंद्र शिंदे यांच्या नावाने लागलेल्या बॅनरकडे सर्वाचेच लक्ष केंद्रीत झाले. त्यावर लबाड बोका ढॉंग करतोय, करुन करुन भागले, नि प्रवचन झाडू लागले, नगरसेवक तुमचे तुमच्या हातून चालले, पायाखाली बघा तुमच्या दुस:याकडे कशाला बोट, नगरसेवक सोडून जातात तर असेल ना तुमच्यात खोट, विश्वास नाही उरला तुमचा तुमच्याच नगरसेवकांवर आता, आधी गळ्यात गळे आणि आता एकदम मारताय लाथा अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून झालेल्या बॅनर हल्याला आता बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून बॅनर मधूनच उत्तर दिल्याने पुन्हा राजकारण तापल्याचे दिसत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"