ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी; युवा सेनेने काढली रॅली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 06:18 PM2022-06-22T18:18:11+5:302022-06-22T18:19:21+5:30
एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी युवा सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी रॅली काढून शिंदे यांना पाठिंबा दर्शवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे :एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या होम ग्राउंड अर्थात ठाण्यात मंगळवारी शिवसैनिकांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेतल्याचे चित्र होते. मात्र बुधवारी ठाणे आणि कळवा परिसरात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर,पोस्टर लावण्यात आले. तर काजूवाडी परिसरातील शिंदे यांच्या निवासस्थानी युवा सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी रॅली काढून शिंदे यांना पाठिंबा दर्शवला.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला गेला. तसेच, काही ठिकाणी शिवसैनिकांनी शिंदे यांच्या विरोधात निदर्शने देखील केली. मात्र शिंदे यांचे मुख्यकार्यक्षेत्र असलेल्या ठाण्यात त्याच्या काहीच प्रतिक्रिया उमटल्या नव्हत्या. येथील शिवसैनिकांनी शिंदे यांना समर्थनही दिले नाही. तसेच त्यांना विरोधही केला नाही. मात्र सुरक्षेचा उपाय म्हणून ठाण्यातील शिंदे यांच्या घराबाहेर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र काल दिवसभरात असा कुठलाही अनुचित प्रकार शिंदे यांच्या निवासस्थानी घडला नाही. मात्र ठाण्यातील कळवा परिसरात काही समर्थकांनी बुधवारी त्यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली आहे.
यामध्ये आम्ही एकनाथ शिंदे यांचे समर्थक असल्याचा बॅनर लावण्यात आला आहे. त्या ठिकाणी 'आम्ही शिंदे साहेब समर्थक' असा मजकूर लिहून बॅनरवर सर्व शिवसेना नेत्यांचे फोटो वगळून फक्त बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे या दोन जणांचा फोटो लावण्यात आला आहे. या बॅनर मधून चक्क उद्धव ठाकरे यांचा फोटो देखील वगळला आहे. तर ठाण्यातही विविध ठिकाणी शिंदे यांना पाठिंबा देणारे शिंदे समर्थकांचे बॅनर झळकले आहेत बुधवारी दुपारी ठाण्यातील युवा सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या निवासस्थानी एक रॅली काढली. यावेळी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या भूमिकेला समर्थन दर्शवणारे बॅनरही फडकवले.