ठाण्यातील बॅनर, होर्डिंग्जची होणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 12:21 AM2020-11-21T00:21:35+5:302020-11-21T00:21:48+5:30
महापौर : अनधिकृत होर्डिंग्ज हटविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहराच्या विविध रस्त्यांच्या कडेला, रस्त्याच्या मधोमध, फुटपाथच्या कडेला, शौचालयांवर सध्या होर्डिंग्ज, बॅनरचा विळखा पडला असल्याचा आरोप शुक्रवारी झालेल्या महासभेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी केला. यातील किती अधिकृत आणि किती अनधिकृत आहेत, याची यादी महापालिकेकडे आहे का? असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला. महापौर नरेश म्हस्के यांनी या संदर्भात चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, शहरातील सर्वच होर्डिंग्ज आणि बॅनरचा अहवाल तयार करून अनधिकृत असलेल्या होर्डिंग्जवर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
शुक्रवारच्या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक देवराम भोईर यांनी या मुद्याला हात घातला. कोलशेत, कापूरबावडी आदींसह इतर भागात सध्या रस्त्यांची दुर्दशा झाली असून सर्वच ठिकाणी होर्डिंग्ज लावले असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यातील अधिकृत किती आणि अनधिकृत किती, असा सवालही त्यांनी केला. याच मुद्याला धरून कॉंग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनीदेखील या मुद्याला हात घालत वर्तकनगर भागातही अशाच पद्धतीने होर्डिंग्ज लावले असल्याचा आरोप केला. पुण्यात होर्डिंग्ज पडून दुर्घटना घडलेली असताना ठाण्यात अशाच पद्धतीने होर्डिंग्ज पडण्याची वाट प्रशासन बघत आहे का, असा सवाल त्यांनी केला. केवळ एका मर्जीतील ठेकेदारासाठी शहरातील रस्ते, फुटपाथ, शौचालये जाहिरातींसाठी आंदण दिले आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित करून प्रशासनाला अडचणीत आणले.
अहवाल तयार करणार- माळवी
राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या विळख्याविरोधात आवाज उठवून यामागे कोणाचा हात आहे, असा सवाल करून अनधिकृत होर्डिंग्ज आणि जाहिरातदारांवर कारवाईची मागणीही केली.
महापौर नरेश म्हस्के यांनीही या अशा जाहिरातदारांसाठी महापालिका काम करीत आहे का, शहरातील किती अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग्ज आहेत, याची तत्काळ माहिती देऊन अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचे आदेशही दिले.
त्यानुसार, उपायुक्त संदीप माळवी यांनी शहरातील सर्वच होर्डिंग्ज आणि बॅनरची चौकशी करून त्याचा अहवाल तयार करून त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.