मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी बॅनरबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:15 AM2017-08-02T02:15:04+5:302017-08-02T02:15:04+5:30
यंदाच्या पालिका निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, या उद्देशाने मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरभर बॅनरबाजी सुरू केली आहे.
भार्इंदर : यंदाच्या पालिका निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, या उद्देशाने मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरभर बॅनरबाजी सुरू केली आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून सतत नवीन युक्ती लढवल्या जात आहेत.
२०१२ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत सुमारे ४८ टक्के मतदान झाले होते. यंदा त्यात वाढ व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ‘माय व्होटर’ या अॅपच्या प्रभावी वापरासाठी पालिकेने कार्यशाळा व प्रशिक्षण घेतले. तसेच मतदान जनजागृतीसाठी कर्मचाºयांना ते अॅप मतदारांकडून जास्तीतजास्त डाऊनलोड केले जावे, यासाठी उद्दिष्ट देण्यात आले. मतदारांना मतदानासंबंधी माहिती तसेच मतदार यादीमधील नावांचा शोध मोबाइलच्या एका क्लिकवर उपलब्ध व्हावा, यासाठी तयार केलेले हे अॅप शहरातील बहुतांश नागरिकांच्या पसंतीला उतरल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यातच निवडणुकीच्या धामधूमीत राजकीय बॅनरबाजी सुरू असतानाच नागरिकांना मतदानाचा विसर पडू नये, यासाठी पालिकेने जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
ठिकठिकाणच्या होर्डींगसह चौक व कमानींवर मतदानाचे महत्व पटवून देणारे बॅनर झळकावून त्यात प्राथमिक शाळेतील अभ्यासक्रमातील नोंदींचाही समावेश केला आहे.