सोशल मीडियामुळे बाप्पाही झाले डिजिटल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 12:29 AM2019-09-01T00:29:19+5:302019-09-01T00:29:27+5:30
संडे अँकर । गणेशोत्सव मंडळांकडून तंत्रज्ञानाची कास ; फोटो-व्हिडीओ फेसबुक, व्हॉट्सअॅपवर अपलोडची स्पर्धा
जान्हवी मोर्ये/प्रज्ञा म्हात्रे ।
डोंबिवली/ठाणे : अगोदर कागदाचे मखर बनवले जात होते. त्यानंतर थर्माकोल, प्लास्टिकची सजावट केली जाऊ लागली. प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी आल्याने पुन्हा कागदाच्या, पुठ्ठ्यांच्या सजावटीला अर्थात इकोफ्रेण्डली सजावटीला प्राधान्य दिले जाऊ लागले. आता फेसबुक, व्हॉट्सअॅप या सोशल मीडियाचा जमाना असल्याने गणेशभक्तांचा बाप्पा डिजिटल झाला आहे. फेसबुकवर गणपतीचे लाइव्ह दर्शन, व्हिडीओ अपलोड करणे आणि अधिकाधिक लाइक्स मिळवणे, याची स्पर्धा सुरू झाली आहे.
लोकमान्य टिळकांनी घरातील गणपती सार्वजनिक केला. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरोधात गणेशोत्सवाचे एक हत्यार म्हणून उपयोग झाला. तो काळ आणि आजचे सोशल मीडियाचे युग पाहता गणेशोत्सव आमूलाग्र बदलत गेला. त्याचे स्वरूप बदलले. कल्याणमध्ये टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवापासूनची काही मंडळे आजही कार्यरत आहेत. त्यामध्ये मेळा गणपतीची परंपरा मोठी आहे. कल्याणचा सुभेदारवाडा गणेशोत्सव मंडळ यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यामुळे मंडळाने अनेक कार्यक्रम आयोजित केले आहे. या मंडळाने १२५ वर्षे बदलता काळ पाहिला आहे. मंडळाच्या कार्यक्रम समितीचे सदस्य प्रशांत दांडेकर यांनी सांगितले की, मंडळ जुने असले तरी नव्या कल्पना आम्ही आत्मसात केलेल्या आहेत. आमच्या मंडळाची वेबसाइट नाही. मात्र, आमचे फेसबुक पेज आहे. या पेजवर आमचे सगळे कार्यक्रम, बाप्पाचे फोटो, सजावट याचे फोटो अपलोड केले जातात. मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची एक व्हिडीओ क्लिप तयार करून ती फेसबुकवर टाकली असता दोनच दिवसांत आठ हजार लोकांनी लाइक केले आहे. फेसबुकवर एक ‘स्मृतिगंध’ पेज आहे. त्यावर अनेक लोक त्यांचे कार्यक्रम देतात. त्यानुसार, आम्ही आमचे कार्यक्रम देतो. त्यावर ही क्लिप टाकली होती. मंडळाचा व्हॉट्सअॅप ग्रुप आणि सदस्य मंडळ सगळा तपशील टाकतात. आमच्या मंडळाकडून वर्षभर विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळे आमचे फेसबुक पेज अपडेट केले जाते. अन्य मंडळाचे कार्यक्रम केवळ गणेशोत्सवात होतात. त्यामुळे त्यांच्याकडे फेसबुकवर सांगण्यासारखे फार कमी असते. तरीदेखील बहुतांश मंडळे फेसबुक पेज तयार करतात.
कल्याणचे विजय तरुण मित्र मंडळ हे ५६ वर्षे जुने आहे. या मंडळाने सामाजिक बांधीलकी जपली आहे. यामंडळाचे देखावे नेहमी वादग्रस्त ठरलेले आहेत. राष्ट्रवाद, देशप्रेम, समाजप्रबोधन, इतिहासातील पराक्रम यावर हे देखावे आधारित असतात. मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांनी सांगितले की, यंदा मंडळाने आरक्षणावर देखावा तयार केला आहे. आरक्षण हा विषय सध्या गाजत आहे. या मंडळाने तयार केलेल्या देखाव्यात गर्भातील मूल आईला मला गर्भाबाहेर यायचे नाही. त्याचे कारण बाहेरच्या जगात मला जात विचारली जाईल. हा नाजूक विषय अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडला आहे. त्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. गर्भातील बाळ हे डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे बोलते, त्याचा इफेक्ट देण्यात आला आहे. त्यासाठी प्रोजेक्टर लावला आहे. चलचित्रांचा देखावा डिजिटलचा वापर करून साकारण्यात आला. मंडळाचे फेसबुक पेज आहे, पण प्रत्येक जण स्वत: पर्सनल फेसबुक अकाउंटवर मंडळाचे कार्यक्रम, फोटो देतो. त्यातून त्यांना भरपूर लाइक्समिळतात.
डोंबिवलीतील गोरखनाथ महाले यांच्या रजनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून बाप्पा स्टेटस विथ सेल्फी असा उपक्रम हाती घेतला आहे. घरगुती व मंडळाच्या बाप्पाचा सेल्फी तसेच १० ते ३० सेकंदांचा व्हिडीओ काढून प्रतिष्ठानला पाठवल्यास तो व्हिडीओ, बाप्पाचा फोटो, केलेली सजावट सगळ्यांपर्यंत पोहोचवणे शक्य आहे. प्रत्येकाच्या घरी १० दिवसांत जाता येत नाही. अनेकांचे गणपती हे दीड दिवसाचेही असतात. एलईडी व्हॅनद्वारे आलेले फोटो व्हिडीओ देखावे दाखवले जातील. त्यातून कोणताही नफा कमावणे, हा प्रतिष्ठानचा उद्देश नाही. ही सेवा मोफत दिली जाणार आहे. केवळ बाप्पाची सेवा व त्याचे डिजिटल होणे लोकांसमोर आणणे हाच हेतू आहे. त्यातून प्रत्येकाला प्रत्येकाच्या गणपतीचे दर्शन घेणे सहज शक्य होणार आहे. डोंबिवलीच्या टिळकनगर गणेशोत्सव मंडळाचे फेसबुक व टिष्ट्वटर अकाउंट आहे. त्यावर बाप्पाचे फोटो, सजावट टाकली जाते. उत्सव काळात तीन डिस्प्ले लावले जातात. त्यावरून कार्यक्रमांचा डिस्प्ले केला जातो, अशी माहिती मंडळाचे संदीप वैद्य यांनी दिली आहे.
ठाणे शहरातील बहुतांश गणेशोत्सव मंडळांचे फेसबुक पेज आहेत. त्यावर व्हिडीओ, फोटो अपलोड केले जातात. शिवाय, भक्तांना गणपतीचे फेसबुक लाइव्हद्वारे दर्शन घेता येते. यातून मंडळांच्या गणपतीला लाइक्स मिळतात व मुंबईतील मंडळांशी कनेक्ट होता येते.
- समीर सावंत, अध्यक्ष, ठाणे जिल्हा सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती