भिवंडीतील बापगांव - देवरुंगचा ग्रा.पं.गांव कारभार पती,पत्नीच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 03:01 PM2021-02-12T15:01:02+5:302021-02-12T15:03:43+5:30
Sarpanch Election : भिवंडी तालुक्यातील ५६ ग्रामपंचतीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निडणूका नुकत्याच पार पडल्या होत्या. या ग्रामपंचायतींवर सरपंच ,उपसरपंच निवडीचा प्रशासकीय कारभार तात्काळ लागू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन टप्यात कार्यक्रम हाती घेऊन निवडणूक प्रक्रिया पार पाडली आहे.
- नितिन पंडीत
भिवंडी - तालुक्यातील ५६ ग्रामपंचतीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निडणूका नुकत्याच पार पडल्या होत्या. या ग्रामपंचायतींवर सरपंच ,उपसरपंच निवडीचा प्रशासकीय कारभार तात्काळ लागू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन टप्यात कार्यक्रम हाती घेऊन निवडणूक प्रक्रिया पार पाडली आहे.यामध्ये तालुक्यातील बापगांव - देवरुंग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पत्नी भारती बाळाराम गोडे तर उपसरपंचपदी पती बाळाराम दिनकर गोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रुपग्रामपंचायतीचा गावकारभार नवरा बायकोच्या हाती सोपवण्यात आल्याने तालुक्यात चर्चेला एकच उधाण आले आहे.
बापगांव - देवरुंग ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ९ असून बुधवारी झालेल्या सरपंच ,उपसरपंच पदाच्या निवडणूकिसाठी भारती गोडे ,बाळाराम गोडे ,राजू गोडे ,फरीना जावरे, गंगुबाई वाघे , किशोर गायकवाड, प्रसाद केणे, वैशाली गोडे, सुजाता केणे आदी सर्व सदस्य उपस्थित होते. या निवडणूकिसाठी पीठासीन अधिकारी म्हणून संदीप परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली होती.ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेत सरपंच पदासाठी भारती गोडे तर उपसरपंचपदासाठी बाळाराम गोडे या पती- पत्नीचे एकमेव उमेदवारी नामांकन दाखल झाले होते. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच पीठासीन अधिकारी संदीप परदेशी यांनी सरपंच भारती गोडे तर उपसरपंच म्हणून बाळाराम गोडे यांची नियुक्ती जाहीर केली.
सरपंच,उपसरपंच पदाची नियुक्ती जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलाल उधळत एकच जल्लोष केला. यावेळी माजी आमदार रूपेश म्हात्रे, पिसे सरपंच विजय पाटील, माजी सरपंच मंगलदास पाटील ,समाजसेवक गणेश मेहर ,मनोहर तरे ,ग्रामसेवक अनिल कांदणे आदींनी नवनिर्वाचित सरपंच ,उपसरपंचांचे पुष्पमाळा अर्पण करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.