वर्तकनगरात समाज मंदिर संघर्ष समितीला बाप्पा पावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:48 AM2021-09-09T04:48:28+5:302021-09-09T04:48:28+5:30
ठाणे : वर्तकनगरवासीयांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचा अविभाज्य भाग असलेल्या वर्तकनगर समाजमंदिर सभागृहाच्या भूखंडाचे श्रीखंड लाटण्याचा कुटिल डाव एका ...
ठाणे : वर्तकनगरवासीयांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचा अविभाज्य भाग असलेल्या वर्तकनगर समाजमंदिर सभागृहाच्या भूखंडाचे श्रीखंड लाटण्याचा कुटिल डाव एका खाजगी संस्थेने आखला आहे. याविरोधात एकवटलेल्या वर्तकनगरवासीयांना अखेर बाप्पा पावला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून भिजत घोंगडे पडलेल्या समाज मंदिराचा प्रश्नावर गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडा अधिकाऱ्यांची व समाज मंदिर संघर्ष समितीच्या सदस्यांची एकत्रित बैठक बोलावली होती. याबाबत सकारात्मक तोडगा गृहनिर्माण मंत्र्यांच्या दरबारात निघेल, अशी सर्वपक्षीय समिती सदस्यांसह स्थानिकांनाही आशा आहे. यासोबतच पालकमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय भूमिका घेतात, याकडेही वर्तकनगरवासीयांचे लक्ष आहे.
वर्तकनगरात १९६५ पासून मध्यवर्ती भागात समाजमंदिर सभागृह होते. अण्णासाहेब वर्तकनगर गणेशोत्सव, लग्नसमारंभ, कबड्डी सामने, व्यायामशाळा आदी कार्यक्रमांसाठी या सभागृहाचा उपयोग होत असे. मात्र काही वर्षांपूर्वी समाजमंदिर सभागृह धोकादायक झाल्याचे कारण देत ही वास्तू जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर अन्य एका संस्थेला ही जागा देण्यात आली. परंतु फक्त आर्थिक फायदा लाटण्यासाठी आणि समाजमंदिराचा मोक्याचा भूखंड गिळंकृत करण्यासाठी या संस्थेने पुनर्विकासाच्या माध्यमातून भूखंडाचे श्रीखंड लाटण्याचा डाव आखल्याचा आरोप वर्तकनगर समाजमंदिर संघर्ष समितीच्या शिवसेना, मनसे, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे सदस्य व स्थानिकांनी केला आहे.
विविध कागदपत्रे केली सादर
म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत आव्हाड यांनी बुधवारी बैठकीत चर्चा केली. या बैठकीत म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी समाजमंदिराशी संबंधित विविध कागदपत्रे सादर केली असून, आव्हाड याप्रश्नी काय तोडगा काढतात, त्यावर संघर्ष समितीच्या आंदोलनाची दिशा ठरणार असल्याची माहिती समितीच्या सदस्यांनी दिली. दरम्यान, गेल्याच महिन्यात याप्रश्नी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हाड यांच्यासह पालकमंत्र्यांचीही भेट घेतली होती.