उल्हासनगरात बाप्पाचे आगमन खड्ड्यातून, सर्वत्र टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:45 AM2021-09-12T04:45:49+5:302021-09-12T04:45:49+5:30

उल्हासनगर : महापालिकेने रस्त्याची दुरुस्ती व रस्त्याची खड्डे भरण्याचे काम सुरू केले असले तरी संततधार पावसामुळे ते अपूर्ण राहिल्याने ...

Bappa's arrival in Ulhasnagar from the pit, criticism everywhere | उल्हासनगरात बाप्पाचे आगमन खड्ड्यातून, सर्वत्र टीका

उल्हासनगरात बाप्पाचे आगमन खड्ड्यातून, सर्वत्र टीका

googlenewsNext

उल्हासनगर : महापालिकेने रस्त्याची दुरुस्ती व रस्त्याची खड्डे भरण्याचे काम सुरू केले असले तरी संततधार पावसामुळे ते अपूर्ण राहिल्याने बाप्पांचे आगमन खड्ड्यातूनच झाले. या प्रकाराने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, ऐन पावसात रस्ता दुरुस्ती व खड्डे बुजविण्याचे काम पालिकेने सुरू केल्याने बांधकाम विभागावर टीका होत आहे.

उल्हासनगर महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजविले जात नसल्याने, महापालिकेच्या कारभाराकडे नागरिक बोट दाखवत आहेत. महापालिकेने रस्ता दुरुस्ती व खड्डे भरण्यासाठी साडेसहा कोटींच्या निधीला मंजुरी दिली. रस्त्यातील खड्डे हे खडी, रेडी, दगड, डेब्रिज आदीने हे खड्डे भरले जात आहेत. मात्र संततधार पावसामुळे, या प्रकाराने अपघातात वाढ झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी विविध विकासकामे व क्रीडासंकुलाचे भूमिपूजन या कार्यक्रमापूर्वी भरपावसात महापालिका बांधकाम विभागाने परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण केले होते. मात्र असे पावसात डांबरीकरण केलेले रस्ते टिकतील का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

महापालिका रस्ता बांधणी, रस्ता दुरुस्ती, नाला दुरुस्ती आदींवर दरवर्षी ३० कोटींपेक्षा जास्त खर्च करूनही रस्त्याची दुरवस्था झाली. दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या सिमेंट रस्त्यावर खड्डे पडल्याने, रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्हे उभे राहिले आहे. एकूणच रस्ते बांधणी, रस्त्याची दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्यावर कोट्यवधींचा खर्च करूनही बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. पावसाने विश्रांती घेतल्यावर, रस्ते दुरुस्ती व खड्डे भरण्याचे काम सुरू करण्याचे संकेत शहर अभियंता महेश शीतलानी यांनी दिले. तसेच काही ठिकाणी कामही सुरू झाल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात गणपती बाप्पाचे आगमन खड्ड्यातून झाले असून, बाप्पांना निरोपही खड्डेमय रस्त्यातून दावे लागणार असल्याची प्रतिक्रिया गणेशभक्त देत आहेत.

--------------

सत्ताधारी व विरोधकांची भूमिका बोटचेपी

महापालिकेवर शिवसेना मित्रपक्षाची सत्ता असून, भाजप-रिपाइंविरोधी पक्षात आहेत. शिवसेना मित्रपक्षाकडे महापौर पदासह बहुतेक विशेष समिती सभापतिपदे आहेत. तर भाजप-रिपाइंकडे उपमहापौर व स्थायी समिती सभापतिपद आहे. मात्र विकासकामांबाबत सत्ताधारी व विरोधी पक्षाची भूमिका नेहमीच गोंधळलेली दिसते, असे नागरिक म्हणतात.

Web Title: Bappa's arrival in Ulhasnagar from the pit, criticism everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.