बाप्पाच्या विदेशवारीला जीएसटीतून सूट

By admin | Published: June 19, 2017 05:08 AM2017-06-19T05:08:08+5:302017-06-19T05:08:08+5:30

राज्यभरात १ जुलैपासून जीएसटी लागू होणार असल्याने काही वस्तू आणि सेवा या नव्याने लागू होणाऱ्या कररचनेत येणार आहेत.

Bappa's exemption from GST | बाप्पाच्या विदेशवारीला जीएसटीतून सूट

बाप्पाच्या विदेशवारीला जीएसटीतून सूट

Next

आविष्कार देसाई।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : राज्यभरात १ जुलैपासून जीएसटी लागू होणार असल्याने काही वस्तू आणि सेवा या नव्याने लागू होणाऱ्या कररचनेत येणार आहेत. त्यामुळे त्या महागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तींच्या किमतीमध्ये वाढ होणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे भक्तांना त्या महागड्या किमतीमध्ये खरेदी कराव्या लागणार आहेत. जमेची बाजू म्हणजे आॅस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका यासह अन्य देशांत बाप्पाचे भक्त मोठ्या संख्येने आहेत. निर्यातीवर जीएसटी लागू नसल्याने त्यांना बाप्पाच्या मूर्ती मात्र स्वस्तात मिळणार असल्याचे दिसून येते.
महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातसुद्धा मोठ्या भक्तिभावाने विघ्नहर्त्याचा उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. २५ आॅगस्टपासून गणेश चतुर्थीला लाडक्या बाप्पाचे आगमन घराघरांमध्ये होणार आहे. या बाप्पाच्या मूर्ती बनविण्याची तयारी मात्र वर्षाच्या बाराही महिने सुरूच असते. रायगड जिल्ह्यातील विविध गणेशमूर्ती कारखान्यातून बाप्पाच्या आकर्षक मूर्ती तयार केल्या जातात. पेण तालुका हा गणेशमूर्ती तयार करण्याचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.
अलिबाग, पेण तालुक्यांतील गणेशमूर्ती कारखान्यातून मोठ्या संख्येने बाप्पाच्या मूर्तींची विक्री केली जाते. देशाच्या कानाकोपऱ्यातच नाही, तर सातासमुद्रापलीकडील आॅस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, इंग्लंड विविध देशांमध्येही त्याला मोठ्या संख्येने मागणी आहे आणि त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे विविध गणेशमूर्ती कारखान्यांतील मूर्तींच्या विक्रीवरून स्पष्ट होते.
गेली काही वर्षे गणेशमूर्तींच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गणेशमूर्तींसाठी आवश्यक असणारे विविध रंग, माती अशा कच्च्या मालाच्या किमती वाढत आहेत.
१ जुलैपासून राज्यात जीएसटी (वस्तू आणि सेवाकर) लागू होणार आहे. त्यामुळे विविध रंग, माती तसेच वाहतूक यांनाही जीएसटी या नव्या कररचनेचा फटका बसणार आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या मूर्तींच्या किमतीमध्येही आपोआप वाढ होणार आहे, असे कर तज्ज्ञांचे मत आहे.
माती आणि रंग यांच्या किमती वाढल्याने मूर्तिकारांना मूर्तींची किंमत वाढवावी लागणार आहे. शिवाय वाहतुकीवरही जीएसटी बसणार असल्याने मूर्ती विकत घेणाऱ्या भक्तांच्या खिशाला मात्र सुमारे २५ टक्क्यांनी अधिक चाट बसण्याची शक्यता आहे.

Web Title: Bappa's exemption from GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.