अंगारकीला चला बाप्पाच्या भेटीला; एसटीच्या ठाणे विभागाचा अनोखा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 02:46 AM2018-07-25T02:46:08+5:302018-07-25T02:46:38+5:30
टिटवाळा अन् पालीला विशेष फेऱ्या
- पंकज रोडेकर
ठाणे : यंदापासून अंगारकीनिमित्त ‘चला बाप्पाच्या भेटीला’ या अनोख्या उपक्रमांतर्गत प्रत्येक ठाणे एसटी विभागातील प्रत्येक डेपोतून साधारणत: दोन बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला ठाणे जिल्ह्यातील ‘टिटवाळा’ आणि रायगड जिल्ह्यातील ‘पाली’ या ठिकाणी त्या सोडण्याचे नियोजन आहे. तसेच अन्य गणपती तीर्थस्थळी जायची अशी मागणी पुढे आल्यास त्या ठिकाणीही बस सोडण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्रवासी संख्या वाढवण्यासाठी हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. पुणे परिवहन विभागाने सुरू केलेल्या ‘अष्टविनायक सहली’च्या धर्तीवर हा उपक्रम यंदापासून प्रादेशिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय ठाणे परिवहन विभागाने घेतला आहे. त्यानुसार ठाणे परिवहन विभागातंर्गत ठाणे १ आणि २, कल्याण, भिवंडी, वाडा, मुरबाड, शहापूर आणि विठ्ठलवाडी अशा आठ डेपोतून यंदापासून साधारणत: २० बस सोडण्याचे नियोजन केले आहे. अंगारकीला बाप्पाच्या दर्शनासाठी जाणाºयांसाठी आॅनलाइन बुकिंगची व्यवस्था केली आहे. तसेच बसमध्ये वाहकाद्वारेही तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे. हा पहिला प्रयत्न असून नागरिकांनी अन्य गणपती तीर्थक्षेत्र असलेल्या स्थळी जायचे असल्यास व तशी मागणी केल्यास बस सोडण्यात येणार आहेत.
अंगारकीला वेगवेगळ्या ठिकाणी बाप्पाचे तीर्थक्षेत्र असलेल्या स्थळी जाणाºया भाविकांची संख्या जास्त आहे. ती लक्षात घेऊन यंदापासून अंगारकीला बस सोडण्याबाबत प्रत्येक डेपो व्यवस्थापकांना सांगितले. तसेच ठाण्यात पहिल्यांदा असा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. वर्षातून येणाºया अंगारकीला बस सोडल्या जाणार आहेत. जर नागरिकांनी टिटवाळा-पाली या व्यतिरिक्त अन्य तीर्थक्षेत्रस्थळी जाण्याची मागणी केल्यास त्याप्रमाणे बसचे नियोजन करण्यात येईल. या उपक्रमाद्वारे सुरू केलेल्या सेवेचा लाभ नागरिकांनी घ्यावा.
- शैलेश चव्हाण, विभागीय नियंत्रक, ठाणे परिवहन विभाग