बार व्यवस्थापकाला मारहाण, तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 05:12 AM2018-03-03T05:12:44+5:302018-03-03T05:12:44+5:30
ठाण्यातील बार व्यवस्थापकाला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण करून, त्याच्या डोक्यात कुंडी फोडल्याप्रकरणी राजेश शेट्टी, सोमनाथ चौधरी, गणेश सालियन या तिघांना नौपाडा पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली.
ठाणे : ठाण्यातील बार व्यवस्थापकाला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण करून, त्याच्या डोक्यात कुंडी फोडल्याप्रकरणी राजेश शेट्टी, सोमनाथ चौधरी, गणेश सालियन या तिघांना नौपाडा पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली. तिघांनाही १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
किसननगर-भटवाडी भागात राहणा-या राजेश शेट्टी याच्यासह तिघांनी मद्यप्राशन करून, २८ फेब्रुवारीला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास चरईतील ‘मुंबई पॅलेस’ या बारमध्ये येऊन विनाकारण गोंधळ घातला. बार व्यवस्थापक उदयकुमार यांनी ‘तुमचे बिल भरा आणि निघून जा,’ असे त्यांना सांगितले. त्या वेळी त्यांच्यापैकी कशेळी भागात राहणाºया सोमनाथ याने उदयकुमार यांची कॉलर पकडली. गणेश आणि राजेश यांनी ‘तेरे को देखने का है क्या, हम कौन है और हम क्या कर सकता है,’ असे बोलून त्यांनाच धमकावले. या तिघांनीही त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना बारबाहेर आणून त्यांचे कपडे फाडले. यात त्यांच्या मोबाइलचेही नुकसान झाले. घड्याळ गहाळ झाले.
त्याचदरम्यान, राजेशने बारच्या गेटवरील कुंडी शेट्टी यांच्या डोक्यात फोडली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव झाला. त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या पथकाने
या तिघांनाही १ मार्चला पहाटे
अटक केली.