पोटच्या ४ महिन्यांच्या बाळाच्या विक्रीचा प्रयत्न करणा-या बारबाला आई, बापासह बालगृहाच्या संचालिकेस अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 10:21 PM2018-03-06T22:21:31+5:302018-03-06T22:21:31+5:30
पोटच्या ४ महिन्यांच्या मुलाला ६ लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न करणा-या बारबाला आई-बापासह बालसुधारगृह चालवणा-या महिलेस ठाणे ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने अटक केली आहे.
मीरा रोड - पोटच्या ४ महिन्यांच्या मुलाला ६ लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न करणा-या बारबाला आई-बापासह बालसुधारगृह चालवणा-या महिलेस ठाणे ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने अटक केली आहे. तीनही आरोपींना ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
भार्इंदर पूर्वेला राहणारा पती तर नालासोपारा येथे राहणारी त्याची पत्नी असे दोघे मिळून एका बालकाला ६ लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत खातरजमा करून कारवाईचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी , मानवी वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक संजय बांगर व पोलीस पथकाने तपास सुरू केला.
चौकशीत सदर ४ महिन्याचे बालक हे पूर्वेला राहणारा इसम व नालासोपारा येथे राहणारी त्याची बारबाला पत्नी यांचे असून सदरचे बालक त्यांना नको होता. शिवाय पैशांची पण गरज होती. म्हणून बारबाला आईने बहिणीच्या परिचीत उदयपूर येथील राधिका चाईल्ड केअर या नावाने बालगृह चालवणा-या महिलेशी संपर्क साधला होता. दोघा दाम्पत्याने त्यांच्या ४ महिन्यांचा मुलगा विकण्यासाठी बालगृह चालवणा-या महिलेच्या माध्यमातून काहींशी संपर्क साधणे चालवले होते. पोलिसांनी बनावट गि-हाईकामार्फत संपर्क साधून मुलाची खरेदी ६ लाख रुपयात नक्की केले. मीरा रोडच्या सिल्वरपार्कजवळील व्हेजीस या हॉटेलात भेटायचे ठरवले. तेथेच सापळा रचून पोलिसांनी मुलाची बारबाला आई व बापासह बालगृहाच्या संचालिकेस अटक केली.
चौकशीत पोलिसांना सदर बारबालेची आणखी एक अडीच वर्षांची मुलगी व १० वर्षांचा मुलगा असल्याचे आढळले. या दोन्ही मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करून पोलिसांनी त्यांना देखील ताब्यात घेऊन बालगृहात ठेवले आहे. मीरा रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अटकेतल्या तिघाही आरोपींना ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.