बारबालेची मैत्री ज्येष्ठ नागरिकास महागात पडली; मुलांसह मिळून लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 09:18 PM2019-08-19T21:18:19+5:302019-08-19T21:18:24+5:30
डोळ्यात मिरचीपूड टाकून मारहाण करत अंगावरील सोन्याची चैन, ब्रेसलेट व अंगठी लुटून पळ काढला होता
मीरारोड - बोरिवलीला राहणारे टपाल खात्यातून निवृत्त झालेले एका ६९ वर्षीय वृद्धास बारबालेशी केलेली मैत्री महागात पडली. त्या बारबालेला तिच्या दोघामुलांसह मिळून वृद्धास डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटल्या प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या काशिमीरा युनिटने अटक केली आहे.
बोरिवलीला राहणारे सदर ज्येष्ठ नागरिक यांनी दोन महिन्यापूर्वी स्वत:चे नाव अनिता (३८) असे सांगणाऱ्या बारबालेशी ओळख झाली होती. दोघंही एकमेकांच्या संपर्कात असतं. फिर्यादी नुसार अनिताने ज्येष्ठ नागरिकाकडे मुलांच्या औषधोपचारासाठी दोन हजार रुपये घेतले होते. ते पैसे परत करायचे आहेत म्हणून अनिताने ४ ऑगस्ट रोजी रात्री ११ वा. त्यांना काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत चेकनाका येथे असलेल्या मंत्रा ऑर्केस्ट्रा बार जवळ बोलावले होते.
ज्येष्ठ नागरिक रात्री तेथे थांबले असता दुचाकी वरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून मारहाण करत अंगावरील सोन्याची चैन, ब्रेसलेट व अंगठी लुटून पळ काढला होता. सदर प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर याचा तपास गुन्हे शाखे कडे देण्यता आला होता.
सहाय्यक निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक अभिजित टेलर व पथकाने या प्रकरणी तपास सुरु केला. पोलिसांनी आधी तबरेज उर्फ मुन्ना आजम खान (२४) रा. बिलालपाडा, नालासोपारा याला अटक केली. त्या नंतर त्याचा भाऊ मेहताब उर्फ छोटु आजम खान (२३) रा. संतोष नगर, दिंडोशी, गोरेगाव याला पकडले. सदर कट अनिताच्या सांगण्या वरुनच रचल्याचे समोर आले. पोलीसांनी ज्योती उर्फ निलोफर उर्फ अनिता गोपाल वायफलकर (३८) हिला देखील अटक केली.
अनिता ही तबरेज व मेहताबची आई असून ती घटना घडल्यावर मुळ गावी अहमदनगर येथे पळुन गेली होती. तर तबरेज याच्यावर जबरी चोरी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीसांनी आरोपीं कडुन १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना २१ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.