बारवी धरण भरले, चार दरवाजे उघडून पाण्याच्या विसर्गास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 12:34 AM2020-08-31T00:34:45+5:302020-08-31T00:43:10+5:30
रविवारी दुपारी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या धरणावर जलपुजन करण्यात आले असून ते आज रात्री तुडुंब भरुन वाहू लागले.
-सुरेश लोखंडे
ठाणे : अंबरनाथ तालुक्यातील एम आयडीसीच्या मालकीचे बारवी धरण रात्री 10.30 भरले असून त्याचे चार गेटमधून पाणी वाहू लागले आहे. या बारवी धरणाची पातळी 72.60 मीटर असून ती आज पूर्ण भरली आहे. त्यामुळे या धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे उघडले जाऊन त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे . बारवी धरण भरण्यास गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल एक महिना विलंब झाला आहे. या धरणात आता मुबलक पाणी साठा तयार झाल्यामुळे ठाणेच्या काही भागासह कल्याण डोंबिवली मनपा, उल्हासनगर, भिवंडी, मीराभाईंदर या मनपासह अंबरनाथ, बदलापून नगर परिषद, जिल्ह्यातील सर्व एम आयडीसील परिसर, कारखाने, आणि भिवंडीसह अंबरनाथ, मुरबाड, भिवंडी तालुक्यातील गांवखेड्यांच्या पाणी कपातीची समस्या मिटली आहे.
रविवारी दुपारी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या धरणावर जलपुजन करण्यात आले असून ते आज रात्री तुडुंब भरुन वाहू लागले. रविवारी रात्री 10.30 वाजता या धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याचे ठाणे जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी लोकमतला सांगितले.
बारवी धरणाचे स्वयंचलित दरवाजे पाणी जादा होताच कोणत्याही क्षणी उघडणार असल्याचा आंदाज घेऊन गुरुवारीच भातसा धर्माप्रमाणे या बारवी धरणाखालील व या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. बारवी धरण व नदी काठावरील अंबरनाथ तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा संबंधी तलाठी, ग्राम सेवक आणि सरपंच यांच्या मार्फत देण्यात आला आहे. या मध्ये अस्नोली, राहटोली, चोण, सागांव पाटीलपाडा, चांदप, पादीर पाडा, पिंपळोली , कारंद, चांदप पाडा आदी गांवांसह नदी काठावरील गांवाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, एम आयडीसी क्षेत्राला पाणी पुरवठा करणार्या बारवी धरणात आज रात्री पासून जोरदार पाऊस सुरु आहे. 86 मिमी पाऊस सकाळपर्यंतधरणात पडला आहे. आता यााबारवी धरणात 95.35 टक्के पाणी साठा तयार झाला आहे. रविवारी धरणाची 72.60 पैकी केवळ 0.23 सेंटीमीटर पाणी पातळी पैकी भरण्यासाठी बाकी होती. या धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता गुरुवारी वर्तवण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने या धरणासह बारवी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या नदीच्या पात्रात व वाहत्या पाण्यााची पातळी वाढणार असल्यामुळे या पाण्यात उतरण्याला बंदी घातली आहे.या सतर्कता इशारा स्थानिक प्रशासनाकडून संबंधित गावांना देण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे सीईओ शिवाजी पाटील यांनी गुरुवारीच जारी केले आहेत. याशिवाय या धरणाची मालकी असलेल्या एम आयडीसी विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी ही संबंत प्रशासनास सतर्कतेचा इशारा आधीच दिला आहे.