अंबरनाथच्या चिखलोली धरणाने गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:47 AM2019-04-26T00:47:47+5:302019-04-26T00:48:02+5:30
जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल इतकाच साठा, पाणी जपून वारण्याचे आवाहन
अंबरनाथ : अंबरनाथ पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणातील पाणीसाठा जलद गतीने कमी होत आहे. १५ जूनपर्यंत पाणी पुरवणे शक्य होईल, असे नियोजन केले जात आहे. मात्र, धरणातील पाणीसाठा लक्षात घेता हे पाणी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहणार आहे. त्यामुळे आतापासूनच पर्यायी पाण्याची व्यवस्था तसेच एमआयडीसीच्या मंजूर पाणीकोट्यातील पाणी हे अंबरनाथ पूर्व भागासाठी वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
अंबरनाथ शहराला उल्हास नदी आणि चिखलोली धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. चिखलोली धरणातील सहा दशलक्ष लीटर पाणी दररोज पूर्व भागात वितरित करण्यात येत आहे. मात्र, उन्हाचा कडाका वाढल्याने आणि पाण्याची पातळी जास्त खालवत चालल्याने या धरणातील पाणीसाठा जून महिन्यापर्यंत उपलब्ध होईल, असे नियोजन केले जात आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून मिळणाºया पाण्यावर जास्त भर दिला जात आहे. चिखलोली धरणाची पातळी ही खालावत असल्याने या पाण्यावर जास्त दिवस अवलंबून राहणे शक्य होणार नाही. त्यातच, गेल्या वर्षीप्रमाणे पाण्यात रासायनिक द्रव्यांचे प्रमाण आढळल्यास ऐन मे महिन्यात नागरिकांची पाण्यामुळे कोंडी होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांसाठी एमआयडीसीचे पाणी घेतले जाते. त्यामुळे या पाण्याचे नियोजन जीवन प्राधिकरणाने आतापासूनच सुरू ठेवले आहे. पाण्यामध्ये रासायनिक द्रव्यांचे प्रमाण आढळल्याने गेल्या वर्षी या धरणातील पाणी न उचलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
यंदा एमआयडीसी भागातील कंपन्यांचे रासायनिक द्रव्य जाणार नाही, याची काळजी घेतली गेली आहे. मात्र, तरीही धरणातील पाणी दूषित झाल्यास पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. धरणाची पाण्याची पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त खालावल्याने या पाण्याचेही नियोजन करूनच आवश्यक प्रमाणात पाणीपुरवठा केला जात आहे.