आधारची सक्ती ही रस्त्यावरची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 01:33 AM2018-06-28T01:33:14+5:302018-06-28T01:33:33+5:30
मतदान कार्ड, पासपोर्टवर आपली सही असते. तशी आधारकार्डवर नाही. मग आधारची गरज काय? खाजगी आयुष्याचा अधिकार सर्वांना आहे
ठाणे : मतदान कार्ड, पासपोर्टवर आपली सही असते. तशी आधारकार्डवर नाही. मग आधारची गरज काय? खाजगी आयुष्याचा अधिकार सर्वांना आहे. परंतु, आधारवरील नंबर घेऊन व्यक्तीचे आजार, सवयी, त्याच्या इतर गोष्टींची माहिती काढली जाते. एकंदरीतच टेक्नॉलॉजिने सामाजिक प्रश्न सुटत नाहीत तर उलट माणसांना यंत्र बनविले जात आहे. सर्वोच्च न्यायालय आधार कार्डची बहुदा सक्ती करणार नाही अशी अपेक्षा आहे. परंतु, हा रस्त्यावरच्या लढाईचा विषय असून याविरोधात एकत्र आलेच पाहिजे, असे मत अॅड.कामायनी बाली यांनी व्यक्त केले.
आधार कार्ड योजना सुरक्षित नसल्याचे खुद्द केंद्र सरकारने कबूल केल्यानंतर देशात ब्रेक आधार चेन्स नावाची मोहिम सुरू आहे. याचा एक भाग म्हणून मंगळवारी ठाण्यात मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात आधार कार्ड लिंक तोडा- जागरण व मार्गदर्शन सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अनिल शालिग्राम होते. यावेळी अॅड. बाली यांच्यासह बायोमेट्रिक तज्ज्ञ जे.डिसुझाही उपस्थित होते.
आधारच्या माध्यमातून व्यक्तीची कोणतीही माहिती खाजगी राहत नाही, ही मुख्य समस्या आहे. ती इलेक्ट्रॉनिक माध्यमातून विविध कंपन्यांना राउटरद्वारे मिळत राहते. त्याची एक फार मोठी चेन तयार होते. ही माहिती विकली जाण्याचीही शक्यता आहे. एक आधार कार्ड काढल्यावर संपूर्ण माहिती जगात जाते. म्हणून आधार हा योग्य पर्याय नाही, असे डिसुझा यांनी सांगितले. तर बोटाचे ठसे, डोळ्यांचे फोटो हेदेखील युनिक नाहीत हे सांगताना डिसुझा यांनी स्पष्टीकरण दिले. डोळ्यांचे फोटो काढून बरोबर मध्यभागी पिनने भोक पाडले व ज्याला ते वापरायचे त्यांनी आपल्या डोळ्यासमोर धरून स्कॅन केले तेव्हा त्याचे डोळे हे ओरिजिनल माणसांसारखे स्कॅन झाले. त्यामुळे डोळ्यांचेही डुप्लिकेट करता येते. आणि असेच डुप्लिकेट वापरून साडेतीन वर्षे गुजरातमध्ये रेशन घोटाळा झाल्याचे डिसुझा यांनी सांगितले.