ठाण्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे १०९ गुंठे जमीन लाटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 09:09 PM2018-04-03T21:09:29+5:302018-04-03T21:09:29+5:30
मृत महिलांच्या बनावट स्वाक्ष-या तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदीखत तयार करुन तब्बल १०८ गुंठे जमीन लाटण्याचा प्रकार देसाई गावात घडला आहे. हा प्रकार उघड होताच जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनाच जमीन मालकाने आपल्या जमीनीसाठी साकडे घातले आहे.
ठाणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदीखत तयार करुन सुमारे १०९ गुंठे जमीन स्वत:च्या नावाने करणा-या आठ जणांविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. महसूल कर्मचा-यांच्या संगनमताने हा प्रकार झाल्याचा आरोप होत असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी देसाई गावातील रामदास पाटील यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली आहे.
ठाणे महानगरपालिकेने दिवा देसाई गावात रस्ता रु दीकरण मोहिमेदरम्यान जमीन मालकांना रस्त्यासाठी आपली जागा टीडीआर च्या बदल्यात देण्याचे आवाहन केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत देसाई गावातील जितेंद्र देशमुख आणि सुनंदा वाघमारे पालिकेकडे त्यांच्या जागेच्या मोबदल्यात टीडीआर साठी यांनी अर्ज केला. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. महसूल विभागातील अधिका-यांच्या संगनमताने नावात फेरफार करुन १२ गुंठे जागेचे टोकन दिल्यानंतर १०९ गुंठे जागा आपल्या नावावर केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर याप्रकरणी १७ मार्च रोजी पाटील यांनी डायघर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून महसूल विभागाकडूनही याबाबतचे जबाब नोंदविण्याचे काम सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रामदास पाटील (६१) रा. देसाई पाटीलवाडा, ठाणे यांची वडीलोपार्जित १०९ गुंठे जमीन देसाई येथे आहे. ती त्यांच्या कुटूंबातील २५ जणांच्या नावाने आहे. यातील १२ गुंठे जमीन २७ लाख रु पयात विकण्याचा व्यवहार रामदास यांचे भाऊ कृष्णा यांच्याकडून सुरु होता. मात्र, तो पूर्ण पैसे न दिल्याने रद्द झाला. परंतु व्यवहारादरम्यान घेण्यात आलेली दस्त यावर बनावट स्वाक्षºया करून बनावट दस्त बनवून १०९ गुंठे जमीन देसाई तलाठी कार्यालयातील तलाठी मदतनीस जितेंद्र देशमुख आणि एकनाथ गोटेकर यांनी बनविले. त्यांनी बनावट दस्ताच्या आधारावर १०९ गुंठे जमीन दुसºयांच्या नावाने करून फेरफार १४६१ आणि १४६२ हे नोंदविले. या व्यवहाराची मूळ जमीन मालकांना मात्र काहीच माहिती नव्हती. वडीलोपार्जित जमीन ठाणे महापालिकेच्या रस्त्यात बाधित होत असल्याचे समजल्यानंतर पाटील कुटुंबीयांच्या जमीनीबाबत ठामपाकडे बाधित जागेचा टीडीआर मिळण्याची मागणी जितेंद्र देशमुख आणि सुनंदा वाघमारे यांनी केली. पाटील कुटूंबियांची १०९ गुंठे जमीन भलत्याच व्यक्तींच्या नावाने झाल्याचे जानेवारी २०१८ मध्ये उघड झाले. त्यानंतर मार्च २०१८ मध्ये जितेंद्र देशमुख (रा. डोंबवली, सुनंदा वाघमारे (रा. मीठबंदर रोड ठाणे), एकनाथ गोटेकर, यशवंत शिंदे रा., चरई, ठाणे, ए. एम. मिरकुटे रा. देसाई, अजय पाटील तत्कालीन मंडळ अधिकारी दहिसर ,फुलचंद पाटील रा. खिडकाळी, ठाणे आणि विश्वनाथ म्हात्रे रा. देसाई आदी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मृतांच्या नावे स्वाक्षरी
विशेष म्हणजे ताराबाई म्हात्रे यांचे २००६ मध्ये तर धोंडीबाई मुंढे यांचे २०१० मध्येच निधन झाले आहे. तरीही त्यांच्या नावे बनावट स्वाक्षऱ्या आणि रजिस्ट्रेशन केल्याचेही आरोपींनी दाखविल्याचीही बाब उघड झाली आहे.
यातील चौकशीला महिना उलटूनही कोणालाही अटक न झाल्याने पाटील कुटूंबियांनी अखेर पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. दरम्यान, या प्रकरणात महसूल विभागाची चौकशी सुरू असून यामध्ये अनेक तलाठी आणि तत्सम अधिका-यांचे संगनमत असल्याचा आरोप गावक-यांनी केला आहे. याबाबत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात दोन वेळा सुनावणीही झाली. त्यानंतर या जमिनी शासन आदेश काढून मूळ मालकाला परत देण्याची प्रक्रि या सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी पाटील कुटूंबियांनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे केली आहे.
‘‘ रामदास पाटील आणि त्यांच्या कुटूंबियांच्या १०८ गुंठे जमिनीचा आठ जणांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदीखत तयार करुन जमीन स्वत:च्या नावावर केल्याची तक्रार दाखल झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. दोषींवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.’’
सुशिल जावळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डायघर