ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर सादर झाली एका गूढ विषयावर आधारित "जाहला सोहळा अनुपम" हि एकांकिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 04:22 PM2018-07-09T16:22:09+5:302018-07-09T16:25:08+5:30
ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर "जाहला सोहळा अनुपम" हि एका गूढ विषयावर आधारित एकांकिका सादर झाली
ठाणे : जीवन जगत असताना प्रत्येकालाच कशाची ना कशाची ओढ असते.काही तरी मिळवण्याची इच्छा असते. अशीच काही तरी वेडी इच्छा मनाशी बाळगून एक तरुण आपल्या कॉलेजचा रिसर्च पूर्ण करण्यासाठी निघालेला असतो.या रिसर्चच्या अभ्यासासाठी तो एका डोंगरात अज्ञात स्थळी जातो आणि अडकतो. तेथे त्याला एक वृद्ध भेटतो आणि त्यातुनच पुढे त्यांचे संभाषण सुरु होते.पुढे दोघांची मैत्री होते. तो वृद्ध त्या युवकाला आजच्या लोकांची जगण्याबद्दल असलेली आसक्ती,ओढ आणि मानवी जीवन कसे क्षणभंगुर आहे ते पटवून देतो. आपला शेवट मृत्यूच आहे आणि मृत्यूनंतर देखील आत्मा कशाप्रकारे भटकत रहातो याची जाणीव करून देतो. इच्छा,अपेक्षांपलिकडे देखील एक जग असते, अशा चिरंतन जगाची ओळख करून देणारी एकांकिका म्हणजे "जाहला सोहळा अनुपम" या एकांकिकेचे लेखन अभिजीत दळवी यांनी केले आहे आणि दिग्दर्शन कदिर शेख यांनी केले . अभिनय कट्ट्यावर हि एकांकिका सादर झाली.
श्रावणी कदम,परेश दळवी आणि आदित्य नाकती यांनी या एकांकिकेत मुख्य भूमिका करत प्रेक्षकांची मने जिंकली.आदित्य नाकती याने वयाच्या १७ व्या वर्षी ७० वर्ष वय असलेल्या "ताडोबा" नावाच्या वृद्धाची भूमिका केली.या भूमिकेसाठी जमलेल्या रसिक प्रेक्षकांनी आदित्यचे विशेष कौतुक केले. एकांकिकेचे नेपथ्य सुद्धा विशेष आकर्षण ठरले, अभिनय कट्टयावर भव्य अशा जंगलाचे नेपथ्य वैभव चौधरी व प्रतिक हिवारकर या जोडीने साकारले. तसेच सहदेव साळकर याने पार्श्वसंगीत दिले.एकंदरीतच एकांकिका पाहून जमलेल्या सर्वच रसिकांनी उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात सर्व अभिनय कट्ट्याच्या कलाकारांचं अभिनंदन केलं. ३८४ क्रमांकाचा या कट्ट्याचे निवेदन राजन मयेकर यांनी केले.जेष्ठ नागरिक तटकरे आजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. या वेळी सहदेव कोळंबकर याने नटसम्राट ही एकपात्री सादर करत प्रेक्षकांना भावुक केले.सातत्याने नवनवीन संहिता आणि आव्हानात्मक भूमिका कट्ट्यावर सादर होत आहेत व त्याला मिळणारा प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद ही आमच्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे असे आयोजक किरण नाकती यांनी सांगितले