आधारवाडी डम्पिंग वर्षभरात बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 12:53 AM2019-03-08T00:53:11+5:302019-03-08T00:53:19+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेचा स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात २२ वा व देशात ७७ वा क्रमांक आला आहे.

Basewadi dumping is closed in the year | आधारवाडी डम्पिंग वर्षभरात बंद

आधारवाडी डम्पिंग वर्षभरात बंद

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचा स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात २२ वा व देशात ७७ वा क्रमांक आला आहे. महापालिकेस मिळालेले हे सांघिक यश असून, पहिल्या १० शहरांत क्रमांक मिळवण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्यासाठी जोरदार प्रयत्न केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, शहरातील आधारवाडी डम्पिंग ग्राउंड हे वर्षभरात बंद करण्याचा मानस महापौर विनीता राणे यांनी व्यक्त केला आहे.
स्वच्छ सर्वेक्षणासंदर्भात माहिती देण्यासाठी राणे यांनी गुरुवारी आपल्या दालनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, सभागृह नेते श्रेयस समेळ आदी मान्यवर उपस्थित होते.
राणे म्हणाल्या, आधारवाडी डम्पिंग बंद करण्यासाठी कंत्राटदाराला कार्यादेश दिला आहे. या डम्पिंगला पर्याय म्हणून बारावे भरावभूमी विकसित केली जात आहे. ही भरावभूमी सुरू झाल्यानंतर आधारवाडी डम्पिंग बंद करून तेथील कचऱ्याच्या डोंगरावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणे शक्य होईल. आधारवाडी डम्पिंग वर्षभरात बंद करण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे. तसेच उंबर्डे व बारावे प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचाही महापालिकेचा मानस आहे. या दोन्ही प्रकल्पांचे काम
सुरू झाले आहे. मात्र, त्याला नागरिकांचा विरोध आहे. ही जरी वस्तुस्थिती असली, तरी गोदरेज कंपनीने दिलेल्या १० कोटींच्या सीएसआर फंडातून प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. त्यामुळे महापालिकेचे गुणांकन वाढले आहे.
त्या पुढे म्हणाल्या, आधारवाडी डम्पिंगवर कचरा टाकण्यासाठी जाणाºया वाहनांसाठी रस्ता नव्हता. त्याकरिता ज्येष्ठ शिवसेना नगरसेवक विश्वनाथ राणे, स्थायी सभापती म्हात्रे, गटनेते दशरथ घाडीगावकर, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी तेथे प्रत्यक्ष पाहणी करून रस्ता तयार करण्याचे काम केले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही पहाटेच डोंबिवली शहरातील स्वच्छतेची पाहणी करून माहिती घेतली आहे. शहर स्वच्छतेवर भर द्यावा, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश आहेत, याकडे महापौरांनी लक्ष वेधले.
कचरा वर्गीकरणासाठी प्रत्येक प्रभाग क्षेत्रात एक शेड उभारली जाणार आहे. कचरा समस्या सोडवण्यासाठी चार प्रभाग क्षेत्रांत कचºयाचे खाजगीकरण केले आहे. त्यामुळे कचरा उचलणाºया गाड्यांची संख्या वाढेल. कंत्राटदार घरोघरी जाऊन कचरा गोळा करेल. तसेच कचरा वर्गीकरणाची जबाबदारीही त्याची आहे. काही ठिकाणी उघडी गटारे बंदिस्त केली. तसेच काही ठिकाणी बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. प्रत्येक प्रभागात प्रत्येकी १० स्वच्छता मार्शल नेमण्यात येणार आहेत. अनेक नगरसेवकांनी त्यांच्या नगरसेवक निधीतून कचराडबे पुरवले आहेत. याशिवाय, पुनर्प्रक्रिया करण्याजोगा कचरा उचलण्यासाठी काही खाजगी कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे. सुका कचरा उचलण्याचे काम त्यांना देण्याचा विचार महापालिका करणार आहे, असे राणे म्हणाल्या.
महापालिका हद्दीत सोमवार ते शुक्रवार कचरा गोळा होण्याचे प्रमाण कमी असते. मात्र, शनिवार व रविवारी नोकरदार घरी असल्याने जास्त कचरा जास्त गोळा होतो, असे म्हात्रे म्हणाले. डोंबिवलीतील टिळकनगर येथील सोसायटी त्यांच्या कचºयावर सोसायटीच्या आवारात प्रक्रिया करते. या सोसायटीचा आदर्श अन्य सोसायट्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
>नागरिकांचीही जबाबदारी
नागरिकांनी कचराकुंडीत टाकावा. तो रस्त्यावर, गटारात टाकू नये. कचराकुंडीतही चादरी, गाड्या, फर्निचर, असा कचरा टाकला जातो. ही काही चांगली बाब नाही. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी महापालिकेबरोबर नागरिकांचीही आहे. नागरिकांनी कचरामुक्त शहराच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतल्यास कल्याण-डोंबिवली स्वच्छ शहराच्या टॉप टेन यादीत येईल, असा विश्वास महापौर राणे यांनी व्यक्त केला.

Web Title: Basewadi dumping is closed in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.