पायाभूत चाचणीचे पेपर फुटले? प्रश्नपत्रिकांचा तुटवडा : पुन्हा झेरॉक्स काढण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 03:11 AM2017-09-08T03:11:52+5:302017-09-08T03:11:57+5:30
महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाकडून घेण्यात येणा-या पायाभूत चाचणीच्या परीक्षेचे (बेसलाइन टेस्ट) पेपर नेहमीप्रमाणे कमी पडल्याने झेरॉक्स काढताना ते फुटल्याचा आरोप झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ठाणे : महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाकडून घेण्यात येणा-या पायाभूत चाचणीच्या परीक्षेचे (बेसलाइन टेस्ट) पेपर नेहमीप्रमाणे कमी पडल्याने झेरॉक्स काढताना ते फुटल्याचा आरोप झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पहिल्या दिवशी भाषेचा पेपर होता. यापूर्वीही या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कमी पेपर सेंटरला पाठवल्याने झेरॉक्स काढाव्या लागल्याची वेळ आली होती आणि तेव्हाही पेपर फुटल्याचा आरोप झाला होता. पण त्यावर काहीच हालचाल झाली नव्हती.
ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरात प्रश्नपत्रिकांचा तुटवडा होता. त्यामुळे शाळांनी पेपरच्या झेरॉक्स काढून परीक्षा घेतल्याचे शिक्षक सेनेच्या अध्यक्षांनी सांगितले.
प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमाद्वारे शालेय शिक्षण विभाग ही चाचणी घेतो. त्यात गुरुवारी पहिला पेपर भाषेचा, शुक्रवारी गणिताचा, सोमवारी इंग्रजी, तर मंगळवारी विज्ञानाचा पेपर होणार आहे. भाषेच्या परीक्षेवेळी ठाणे शहरातील बहुतांशी शाळांत प्रश्नपत्रिका कमी पडल्यामुळे झेरॉक्स काढाव्या लागल्या. गणिताच्या पेपरच्या प्रश्नपत्रिकाही कमी असल्याने त्याच्याही झेरॉक्स काढण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्याचे शिक्षक सेनेचे ठाणे अध्यक्ष दिलीप डुंबरे यांनी सांगितले. कल्याण व डोंबिवली परिसरातही हीच स्थिती आहे. झेरॉक्सच्या दुकानातून या प्रश्नपत्रिका फुटल्याचे संघटनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रशांत भांबरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
बहुतांश शाळांत विद्यार्थी संख्येपेक्षा कमी प्रश्नपत्रिका असल्याने झेरॉक्स काढाव्या लागतात. शिक्षण विभागाकडून त्रास होऊ नये, म्हणून या शाळा नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर तक्रारी करत असल्याचे डुंबरे व भांबरे यांनी सांगितले.
पेपरफुटीच्या या आरोपांसंदर्भात ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांना उशिरापर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही.