बोगस ठरावाच्या आधारे ठाण्यातील सोसायटीचा वाढीव एफएसआय विकासकाला विकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 06:06 PM2018-03-29T18:06:52+5:302018-03-29T18:06:52+5:30
सदस्यांच्या बोगस सह्या करून सोसायटीचा एफएसआय विकासकांना विकल्याप्रकरणी सात आरोपींविरूद्ध ठाण्यातील कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
ठाणे : बनावट ठरावाच्या आधारे वाढीव एफएसआय विकासकाला विकून ३२ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सोसायटीच्या पदाधिकाºयांसह विकासकाविरूद्ध कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
घोडबंदर रोडवरील पुरूषोत्तम प्लाझा को-आॅपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये दोन वर्षांपूर्वी हा प्रकार घडला. सोसायटीचे कोषागार रविंद्र थिटे यांनी याप्रकरणी सोसायटीचे अध्यक्ष मोहन भोईर, सचिव सौ. राणी देसाई, जय डेव्हलपर्सचे भागीदार कमलेश राणावत आणि जितेंद्र देढिया, मे. शहा अॅण्ड देढिया एन्टरप्रायजेसचे गौरव देढिया, पियुष शहा आणि गौरव कन्स्ट्रक्शनचे भागीदार धर्मेन्द्र जिंदाल यांच्याविरूद्ध तक्रार दिली होती. १४ एप्रिल २0१६ रोजी सोसायटीची कोणतीही बैठक झालेली नसताना, सोसायटीचे अध्यक्ष मोहन भोईर आणि सचिव राणी देसाई यांनी बनावट कागदपत्रे तयार केली. त्यासाठी सोसायटीच्या सदस्यांच्या बनावट सह्या केल्या. या बनावट ठरावाच्या आधारे आरोपींनी विकासक आणि भागिदारांना कन्फर्मेशन डिड करण्याचे अधिकार प्रदान केले. आरोपींनी कन्फर्मेशन डिडची नोंदणी करून महापालिकेमध्ये कागदपत्रे सादर केली. त्यानंतर आवश्यक असलेली इतर कागदपत्रे आरोपींनी तयार केली. या बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी सोसायटीच्या गार्डनचा एफएसआय बळकावला. रेडिरेकनरनुसार या जागेची किंमत २२ कोटी रुपये तर बाजारभावानुसार ३२ कोटी रुपये असल्याचा आरोप थिटे यांनी केला आहे. सोसायटीच्या आरोपी पदाधिकाºयांनी या व्यवहारामध्ये इतर आरोपींकडून ५५ लाख रुपये घेतल्याचा आरोपही थिटे यांनी केला आहे. तक्रारदाराने यासंदर्भात ठाणे न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. आरोपींनी दखलपात्र गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी निरिक्षण प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी आर.टी. इंगळे यांनी नोंदविले. न्यायालयाच्या आदेशानुसार कासारवडवली पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरूद्ध २२ मार्च रोजी गुन्हा दाखल केला.
सोसायटीचे सभासद नसलेल्यांच्याही ठरावावर सह्या
पुरूषोत्तम प्लाझा सोसायटीच्या सभासदांनी विकासकाच्या फायद्यासाठी घेतलेल्या ठरावावर बोगस सह्या केल्याचा आरोप तक्रारदार रविंद्र थिटे यांनी केला. त्यांचा दावा न्यायालयाने ग्राह्य धरला. सोसायटीच्या ज्या सदस्यांच्या बोगस सह्या ठरावावर करण्यात आल्या, त्यांनी त्या सह्या त्यांच्या नसल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयासमोर सादर केले. सोसायटीचे भागीदार नसलेल्या काही लोकांच्या सह्यादेखील ठरावावर आहेत. त्यांचे सोसायटीमध्ये एकही दुकान किंवा फ्लॅट नसून, आरोपींनी घोटाळा करण्यासाठी त्यांच्या सह्यांचा वापर केल्याचे स्पष्ट मत न्यायालयाने नोंदविले.