युतीतील लढाई पोहोचली ठाकुर्लीतही
By admin | Published: April 10, 2017 05:56 AM2017-04-10T05:56:40+5:302017-04-10T05:56:40+5:30
उड्डाणपूल, होम प्लॅटफॉर्म, समांतर रस्ता, टर्मिनस अशी वेगवेगळी कामे करत ठाकुर्लीचा कायापालट करण्याचे काम सुरू असतानाच रविवारी
डोंबिवली : उड्डाणपूल, होम प्लॅटफॉर्म, समांतर रस्ता, टर्मिनस अशी वेगवेगळी कामे करत ठाकुर्लीचा कायापालट करण्याचे काम सुरू असतानाच रविवारी मात्र होम प्लॅटफॉर्मवरून धावणाऱ्या पहिल्या लोकलला हिरवा झेंडा दाखवून भाजपाने त्या कामाचे श्रेय आपल्या पदरात पाडून घेतले.
कल्याणचे खासदार या नात्याने शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी ही कामे मार्गी लावल्याचा दावा शिवसेना करीत असली, तरी भाजपाचे स्थानिक नेते श्रीकर चौधरी यांच्या अथक प्रयत्नांचे हे फळ असल्याचे सांगत भाजपाने त्या कामावर दावा केल्याने युतीतील श्रेयाची लढाई ठाकुर्लीच्या प्लॅटफॉर्मवरही पोचली. ‘भाजपा झिंदाबाद’च्या घोषणांत पहिली लोकल रवाना झाली.
ठाकुर्लीतील फलाट क्रमांक एक आणि दोन यांचा संयुक्त प्लॅटफॉर्म बारा डब्यांच्या गाड्यांसाठी जेव्हा वाढवला, तेव्हा तो खूप निमुळता झाला होता. एकाचवेळी दोन्ही दिशांच्या लोकल आल्या, तर प्रवाशांची तारांबळ उडत असे. त्यामुळे त्याच्या रूंदीकरणाची गरज होती. शिवाय ठाकुर्ली, खंबाळपाडा, कल्याणदरम्यान समांतर रस्त्यालगतच्या वाढत्या वस्तीसाठी नव्या पादचारी पुलाची, सुसज्ज तिकीटघराचीही गरज होती. त्याचे एकत्रित काम रविवारी आठ तासांचा मेगाब्लॉक घेऊन ते पूर्ण करण्यात आले. ठाकुर्लीतील सध्याच्या क्रमांक एकच्या फलाटाच्या चोळे दिशेला होम प्लॅटफॉर्म बांधण्याचे काम आधीच पूर्ण झाले होते. मात्र रूळाची दिशा बदलणे, ओव्हरहेड वायर टाकणे, सिग्नल आदी कामे रविवारी पूर्ण झाली आणि सायंकाळी त्या फलाटाच्या नव्या दिशेचा वापर करून वाहतूक सुरूही झाली. सध्याच्या निमुळत्या फलाटाचे कामही हाती घेतले असून तेही लवकरच पूर्ण होईल. ते झाले की फलाट एकवर दोन्ही बाजूंनी उतरणे सुलभ होईल. या कामासाठी डोंबिवली ते कल्याणदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला. त्यासाठी डोंबिवलीतून विशेष धीम्या गाड्या सोडण्यात आल्या. मात्र त्याचे नियोजन नसल्याने प्रवाशांना त्याचा फायदा होण्यापेक्षा त्रासच सहन करावा लागला. कल्य
ाण आणि ठाकुर्ली स्थानकाच्या विकासासाठी ३० कोटी मंजूर झाले होते. नव्या कामात ठाकुर्लीतील फलाटाचे कल्याणच्या दिशेचे वळणही कमी केले आहे. रेल्वे रूळांची जोडणी, ओव्हर हेड वायर जोडणीच्या कामासाठी ३०० कर्मचाऱ्यांचा ताफा कार्यरत होता. एकाचवेळी दोन दिशांना उपस्कर आणून ओव्हरहेड वायरची जोडणी करण्यात आली. (प्रतिनिधी)
अंबरनाथ गाडीला झेंडा
ठाकुर्लीतील मेगाब्लॉकचे काम पूर्ण होताच संध्याकाळी ५.४५ वाजता नव्या फलाटात आलेल्या अंबरनाथ लोकलच्या मोटरमन, गार्ड, दिवसभर काम केलेल्या रेल्वेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सन्मान केला आणि या लोकलला हिरवा झेंडा दाखवला.
त्यावेळी ‘नरेंद्र मोदी आगे बढो’, ‘फडणवीस आगे बढो’आणि पाठोपाठ ‘रवींद्र चव्हाण आगे बढो’च्या घोषणा देण्यात आल्या. ठाकुर्लीतील कामांसाठी भाजपा १२ वर्षे प्रयत्न करत असल्याचा दाखला चव्हाण यांनी दिला.
स्थानिक नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी लोकल, मोटरमनला औक्षण केले. यावेळी या कामांचा पाठपुरावा करणारे श्रीकर चौधरी यांच्यासह भाजपाचे विविध नेते, पदाधिकारी आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
डोंबिवलीत ढिसाळ नियोजन
या मेगा ब्लॉकमुळे धीम्या मार्गावरील वाहतूक दिवा ते कल्याणदरम्यान जलद मार्गावरून वळवण्यात आली. त्या काळात कल्याणकडे येणाऱ्या गाड्या कोपर आणि ठाकुर्ली स्थानकात थांबत नव्हत्या. या काळात डोंबिवलीतून विशेष गाड्या सोडण्यात आल्या. पण या गाड्यांबाबत पुरेशा उद््घोषणा नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला.
फलाट तीनवरील प्रवाशांना डोंबिवली गाडी सुटेपर्यंत त्याची कल्पना येत नसल्याने त्यांची अकारण त्रेधा उडली. पूर्वी ठाणे ते कल्याणदरम्यान एका स्थानकात कामे असली तरी या पूर्ण पट््ट्यातील वाहतूक बंद रहात असे.
दिवा स्थानकातील कामांमुळे आता निम्मी वाहतूकच बंद ठेवावी लागल्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आणि मेगाब्लॉक आठ तासांचा असूनही प्रवाशांना कमी त्रास सहन करावा लागल्याचा दावा केला.
ठाकुर्ली फाटक बंद
ठाकुर्लीतील रेल्वे फाटक मेगाब्लॉकच्या काळात पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीला जाणाऱ्या वाहनचालकांना ठाकुर्लीचा शॉर्टकट वापरता आला नाही. त्यांना वळसा घालून कल्याण व डोंबिवली गाठावे लागले.
आता प्रतीक्षा कारशेडची
ठाकुर्लीतील उड्डाण पुलाचे काम हळूहळू सुरू होते आहे. पण ठाकुर्लीतून मेल-एक्स्प्रेससाठी उड्डाण टर्मिनसचे कामही केले जाणार आहे. त्याचबरोबर लोकलसाठी तेथून कारशेड सुरू करावी, अशीही मागणी आहे. सध्या कल्याण स्थानकातील काही लोकल ठाकुर्ली पॉवर हाऊसच्या जागेत आणून उभ्या केल्या जातात. त्यांच्यासाठी कल्याण स्थानक खूप दूर आहे. त्यामुळे तेथे कारशेड सुरू झाली, तर ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा येथील प्रवाशांना त्याचा फायदा होऊ शकतो.
समांतर रस्ता रखडलेला : डोंबिवली-कल्याण समांतर रस्त्याला सध्या उड्डाणपुलाच्या आधारे जोडण्याचे आश्वासन दिले जात असले, तरी ठाकुर्लीतील ज्या प्रवाशांना उड्डाणपुलाचा वापर करायचा नाही किंवा हे रहिवासी ठाकुर्ली पूर्व, खंबाळपाडा भागात राहतात त्यांना स्टेशनपासून समांतर रस्त्यापर्यंत जाण्यासाठी प्रशस्त रस्ता सध्या उपलब्ध नाही. तो लवकरात लवकर उपलब्ध करण्याची तेथील रहिवाशांची मागणी आहे.