४४ कोटी रुपयांच्या निधीवरून जुंपली श्रेयाची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 03:21 AM2018-08-29T03:21:10+5:302018-08-29T03:21:29+5:30
एमआयडीसीतील सुविधा : निधी आम्हीच आणल्याचा कामा संघटनेसह शिवसेना, भाजपाचाही दावा
डोंबिवली : शहरातील एमआयडीसीतील रस्ते, पदपथ आणि पथदिवे यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे एमआयडीसीने त्यासाठी ४४ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. हा निधी अद्यापही यंत्रणेकडे आलेला नाही. पण, या निधीवरून कामा संघटना, आमदार सुभाष भोईर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात श्रेयासाठी लढाई सुरू झाली आहे.
एमआयडीसीकडे आम्ही आठ वर्षे पाठपुरावा केला. त्यामुळे एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांनी गटारे व पथदिव्यांसाठी ४४ कोटींचा निधी मंजूर केल्याचे कारखानदारांच्या कामा संघटनेने मागील आठवड्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्यावर भोईर यांनी, हा निधी माझ्याच प्रयत्नामुळे एमआयडीसीला मिळाल्याचा दावा मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
केडीएमसीचे शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या उपस्थितीत भोईर यांनी हा दावा केला. या वेळी भोईर म्हणाले, जर ‘कामा’ने हा निधी आणला तर त्यांना त्यासाठी आठ वर्षे पाठपुरावा का करावा लागला. यावरून त्यांनी केवळ कागदोपत्री हालचाल केली असेल, पण माझ्या मार्च २०१७ च्या पत्रानंतर तातडीने घडामोडींना वेग आला. एमआयडीसीचे सीईओ सेठी यांनी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त पी. वेलरासू, शहरअभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्यासमवेत बैठक घेतली. यावेळी रस्ते वगळता गटार आणि पथदिव्यांसाठी हा निधी मंजूर केले होते. त्यामुळे हे श्रेय माझेच असल्याचा पुनरु च्चार त्यांनी केला. लवकरच ही कामे होणार असून, त्यानंतर रहिवाशांना दिलासा मिळेल. एमआयडीसीतील कारखानदरांनीही त्यांची जबाबदारी ओळखून त्या भागातील गैरसोयी दूर केल्यास बरे होईल, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दुसरीकडे हा निधी आणण्यासाठी राज्यमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रचंड पाठपुरावा केल्याचा दावा भाजपानेही केला. भाजपाच्या महिला आघाडी प्रतिनिधी व उपाध्यक्षा मनीषा राणे यांनी सांगितले की, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण याबाबत सातत्याने पाठपुरावा करत होते, पण त्यांनी श्रेय घेण्यापेक्षा सुविधा मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आमदार सुभाष भोईर यांनी कधी येथील रस्ते पाहणीदौरा केला आहे का?, निवासी विभागांतील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत काय? इथे पाणीसमस्या केवढी आहे, त्याचे काय?, त्यासाठी ते काय करत आहेत, असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान, महापालिकेचे शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी म्हणाले की, भोईर यांचा पत्रव्यवहार आणि पाठपुराव्यानंतर बैठक झाली होती, त्यावेळी मी पण उपस्थित होतो. त्यानंतर हा निधी मंजूर झाला. कामा संघटनेनेही पाठपुरावा केला असेल, त्याबाबत माहीत नाही, पण भोईर यांनी केल्याचे सर्वश्रुत आहे.
राजकारण करायचे नाही
कामाचे सरचिटणीस देवेन सोनी म्हणाले की, या निधीबाबत आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही. आम्ही निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो. आता निधी मिळाला आहे. सुविधा वेळेत मिळणे आवश्यक आहे. त्याकडे सगळ््यांनी लक्ष द्यावे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.