विटावा ते कोपरी पुलाच्या होऊ घातलेल्या कामावरुन शिवसेना, राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 02:44 PM2018-04-25T14:44:51+5:302018-04-25T14:46:21+5:30
विटावा पुलाच्या होऊ घातलेल्या कामाच्या श्रेयावरुन आता पुन्हा शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद उफाळला आहे. या दोघांनीही माझ्यामुळेच हा पुल मार्गी लागत असल्याचा दावा केला आहे.
ठाणे - कळवा खाडी पुलावर तिसऱ्या पुलाचे काम सुरु असतांना आता शासनाने विटावा ते कोपरी दरम्यान खाडी पुलाची उभारणी करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. परंतु आता भविष्यात होऊ घातलेल्या या पुलाच्या कामावरुन देखील शिवसेना आणि राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. राष्ट्रवादीच्या आमदाराच्या म्हणन्यानुसार हे काम माझ्यामुळे झाले आहे, तर मुळात या खाडी पुलाचा प्रस्तावासाठी मीच आग्रही होतो असा दावा शिवसेनेच्या खासदाराने केला आहे. त्यातही हा पुल पालिका बांधणार की, एमएमआरडीए याबाबतही या दोघांनी केलेले व्यक्तव्य वेगवेगळे आहे. त्यामुळे या पुलाबाबतच साशंकता निर्माण झाली आहे.
विटावा ते कोपरी खाडी पुल उभारण्यात यावा तसेच कळवा नाका ते आत्माराम पाटील चौक या रस्त्याचे काम करण्यात यावे यासाठी मागील हिवाळी अधिवेशनात मागणी केल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती. त्यानुसारच या दोनही कामांना राज्य शासनाने मंजुरी दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर यातील विटावा पुलाचे काम महापालिकेने करावे आणि कळवा ते आत्माराम पाटील चौक रस्त्याचे काम राज्य शासनाची जबाबदारी असेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही आव्हाडांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान या पुलाच्या कामासाठी मागील अडीच वर्षे पाठपुरावा करण्यात आल्याचा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. त्यानुसार या पुलाचा प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला दिले असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. केवळ या पुलाचेच नाही तर येथे होत असलेल्या स्कायवॉकवरही शिंदे यांनी दावा ठोकला असून माझ्याच प्रयत्नामुळे हे कामही मार्गी लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विटावा पुलाबाबतचा पाठपुरावा मुख्यमंत्री, एमएमआरडीए आणि महापालिका आयुक्त स्तरावर सुरु असल्याचे सांगत केव्हा केव्हा कशा पध्दतीने याचा पाठपुरावा सुरु ठेवला होता, याचे तारेखीनिशी पुरावे देखील शिंदे यांनी आता सादर केले आहेत.
मंगळवारी ठाणे शहरातील वाहतुक कोंडी फोडण्यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिंदे यांच्या व्यक्तीरीक्त खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक यांच्या व्यतिरिक्त ठाण्यातील अन्य कोणीही लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या दाव्यात कितपय तथ्य आहे, हे तपासण्याची वेळ आता आली आहे. एकूणच आता पुन्हा कळव्यात आमदार विरुध्द खासदार असा संघर्ष सुरु झाला आहे.