बावनचाळ परिसर बनलाय अवैध धंद्यांचा अड्डा; पत्ते, जुगाराचेही रंगतात डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 01:30 AM2020-02-07T01:30:42+5:302020-02-07T01:31:13+5:30
कचरा, डेब्रिज टाकण्याचे हक्काचे ठिकाण
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील परंतु रेल्वेची हद्द म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाकुर्ली पश्चिमेतील बावनचाळ परिसराला दोन दशकांपासून अवकळा आली आहे. डेब्रिज आणि कचरा टाकण्याचे हे हक्काचे ठिकाण बनले आहे. बावनचाळीतील बहुतांश घरांची पडझड झाली असून, या परिसराचा अनैतिक कृत्यांसाठीही वापर होऊ लागला आहे. गुरुवारी सकाळी एका बॅगेत आढळलेल्या मृतदेहावरून हे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
हद्दीच्या वादात, कशी परवड होते, याची प्रचीती बावनचाळीचा परिसर पाहता येते. दिवसाढवळ्या तसेच रात्री बिनदिक्कतपणे येथे अवैध धंदे सुरू असतात. महाविद्यालयीन तरुणतरुणींचा, प्रेमीयुगुलांचा सकाळपासूनच याठिकाणी राबता असतो. एकीकडे अश्लील चाळ्यांचे प्रकार सुरू असताना दुसरीकडे एकट्यादुकट्या जाणाºया मुली, तरुणींचा विनयभंग करण्याचा प्रकार येथे वावरणाऱ्या टोळक्यांकडून सुरू असतात.
दुसरीकडे मोडकळीस आलेल्या घरांमध्ये गांजाचा व्यापार जोमाने चालत असल्याची सूत्रांची माहिती आहे. तेथील रेल्वे ग्राउंडवर रात्रीच्या सुमारास मद्यपींचे अड्डे भरत असल्याने या परिसराला ‘ओपन बार’चे स्वरूप येते. पत्त्यांचे आणि जुगाराचे डावही येथे रंगतात. सकाळच्या सुमारास येथे मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्यांचा खच आढळून येतो. प्रभातफेरीसाठी येणाºया नागरिकांना याचा त्रास होतो. महत्त्वाचे म्हणजे या अनैतिक धंद्यांमुळे नागरिकांचे फिरणे दुरापास्त झाले असताना रहिवाशांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल बंद झाल्याने सध्या येथील नव्या ठाकुर्ली उड्डाणपुलावरून सातत्याने वाहनांची वर्दळ सुरू आहे. याउपरही येथे अनैतिक घटना चालूच आहेत. या भागातील रस्त्यांवर रात्रीच्या सुमारास सदैव अंधाराचे साम्राज्य होते. मनसेच्या इशाºयानंतर येथे पथदिवे लावण्यात आले आहेत. मात्र, त्यांचा प्रकाश पुरेसा पडत नसल्याने येथे हायमास्ट दिवे असणे आवश्यक आहे.
परंतु, याकडेही कानाडोळा करण्यात आला आहे. दरम्यान, या मोकळ्या परिसरात आता मोठ्या प्रमाणावर डेब्रिज आणि कचरा आणून टाकला जात आहे. वर्षभरापूर्वी रेल्वे ग्राउंडमध्येच कचरा संकलन केंद्र उघडले होते. परंतु, आता रस्त्यांच्या दुतर्फा डेब्रिज आणि कचºयाचे ढिगारे आढळून येत आहेत.
रेतीची अवैध वाहतूक
या परिसरातून रात्री उशिरा रेतीची अवैध वाहतूकही सर्रासपणे होते. मोठागाव ठाकुर्ली, चिंचोड्याचापाडा येथे रेती भरून रात्रीच्या रात्री ठाकुर्लीच्या या भागातून ट्रक कल्याणकडे रवाना होतात.
लैंगिक अत्याचाराची घटना
बावनचाळ परिसरात दोन वर्षांपूर्वी एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटनाही घडली होती.