वेळीच सतर्क व्हा; अन्यथा हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:49 AM2021-09-16T04:49:59+5:302021-09-16T04:49:59+5:30
कल्याण : सध्याच्या डिजिटल युगात जोडीदाराचा शोधही ऑनलाइन घेतला जात आहे. मॅट्रोमोनियल वेबसाइटच्या माध्यमातून तो शोधणे सोयीस्कर असले ...
कल्याण : सध्याच्या डिजिटल युगात जोडीदाराचा शोधही ऑनलाइन घेतला जात आहे. मॅट्रोमोनियल वेबसाइटच्या माध्यमातून तो शोधणे सोयीस्कर असले तरी यातून फसवणुकीचे प्रकारही सर्रास सुरू आहेत. यात मुलीच नव्हे, तर मुलांचीही फसवणूक होत आहे. लाखोंचा गंडादेखील घातला जात असल्याने ऑनलाइन जोडीदार शोधताना सावधान; अन्यथा हात पिवळे होण्याआधीच तुमचा खिसा रिकामा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत लग्नसराईत खंड पडला होता. कालांतराने रुग्णसंख्या कमी झाल्यावर निर्बंध शिथिल केले असले तरी लग्नसराईतील उपस्थितीवर मर्यादा घातल्या आहेत. सध्या सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. यात जोडीदाराचा शोधही ऑनलाइन घेतला जात आहे. डिजिटलच्या युगात जोडीदाराची निवड करण्याचा फंडा वाढला असला तरी लग्नाआधी फसवणूक होणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यायला हवी. उच्च शिक्षित महिलांना लग्नाचे आमिष दाखवीत हनी ट्रॅपचा असाच एक फसवणुकीचा प्रकार जुलै महिन्यात उघडकीस आला. यात डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांनी उघड केलेल्या गुन्ह्यात शैलेश प्रभाकर बांबार्डेकर या आरोपीला मुंबईच्या कांदिवली येथून अटक केली. जीवनसाथी डॉट कॉम या मॅट्रोमोनियल वेबसाइटवर आरोपी हा प्रथम माने या खोट्या नावाने अकाउंट उघडून उच्च शिक्षित महिला विशेष करून घटस्फोटित आणि विधवा महिलांशी ओळख करून त्यांना आमिष दाखवून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा, हेदेखील चौकशीत उघड झाले आहे. त्याने १० तोळे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला होता. याची तक्रार विष्णूनगर पोलीस ठाण्यात १६ एप्रिलला केल्यावर कसोशीने तपास करून शैलेशला अटक करून त्या महिलांकडून घेतलेले १४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
-------------------------------------------
अशी होऊ शकते फसवणूक
संकेतस्थळावर नाव व फोटो नकली व्यक्तींचा टाकून बनावट प्रोफाइल तयार केली जाते. बनावट पत्ता, तसेच नोकरी असल्याचे भासवूनही तरुणींची फसवणूक केली जात आहे.
तरुण असो अथवा तरुणीशी अगोदर मैत्री करण्यात येते. त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाची मागणीही घालण्यात येते. समोरील व्यक्ती गळाला लागल्यानंतर पैशांची मागणी करण्यात येते.
--------------------------------------------
ही घ्या काळजी
ऑनलाइन लग्न जुळविणाऱ्या संस्थांच्या संकेतस्थळांवर बनावट नाव, पत्ते, फोटो यासह खोटे प्रोफाइल तयार करून आर्थिक फसवणूक केली जाते. याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. संकेतस्थळावर दिलेली माहिती खरी आहे की खोटी, याचीही खातरजमा करावी.
मॅट्रोमोनियल वेबसाइटवर रजिस्टर करण्यासाठी नवीन ई-मेल आयडीचा वापर करावा. यासह मॅट्रोमोनियल वेबसाइटवर फोटो, फोन नंबर आणि पत्ता यासारख्या खाजगी गोष्टी शेअर करण्यासदेखील मनाई केली आहे. सरकारने युजर्सला सूचना दिली आहे की, कोणत्याही मॅट्रोमोनी वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करण्याआधी त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या. यासाठी वेबसाइटचे रिव्ह्यूज वाचावे आणि त्यावर विश्वास ठेवण्यासाठी माहीतगाराचा सल्ला घ्यावा.
------------------------------------------
‘त्या’ व्यक्तीला प्रत्यक्ष भेटा
मॅट्रोमोनियल संकेतस्थळाच्या माध्यमातून वाढलेले फसवणुकीचे प्रकार पाहता कोणतीही लिंक डाऊनलोड अथवा फॉरवर्ड करताना वारंवार विचार करा. अधिकृत संकेतस्थळालाच प्राधान्य द्या. विवाहसंबंधी गोष्टीमध्ये विशेष काळजी घ्या. पैशांचे व्यवहार करताना संबंधित व्यक्तीला प्रत्यक्ष भेटा, असे आवाहन सायबर विभागाने केले आहे.
-------------------------------------------