सावधान! पावसाळा सुरू होताच बिळातील साप येणार बाहेर; काळजी घेण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 10:20 AM2022-06-19T10:20:52+5:302022-06-19T10:20:58+5:30
कोब्रा अर्थात नाग मोठ्या प्रमाणात आढळतात. विषारी सापांच्या यादीत यांचा समावेश होतो.
- पंकज पाटील
बदलापूर : पावसाळा सुरू होताच बिळात लपलेले वेगवेगळे साप बाहेर पडतात. पाण्याऐवजी कोरड्या जागेत राहणे साप पसंत करीत असल्याने पावसाळ्यात साप बाहेर पडून आपल्या सोयीची जागा शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे, असे सर्पमित्रांनी सांगितले.
जिल्ह्यात हे विषारी साप आढळतात
जिल्ह्यात कोब्रा अर्थात नाग मोठ्या प्रमाणात आढळतात. विषारी सापांच्या यादीत यांचा समावेश होतो. नागासोबतच घोणस आणि मण्यार या सापांची संख्याही जास्त आहे. घोणस ही अत्यंत चपळ आणि घातक असते. धामण आणि नानेटी हे बिनविषारी सापही आढळतात. त्याच्या दंशामुळे मानवी जीवाला धोका नसला तरी त्यापासून नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.
सर्पदंश होऊ नये म्हणून घ्या काळजी-
सर्पदंश टाळण्यासाठी शक्यतो प्रत्येक व्यक्तीने अंधाराच्या ठिकाणी टॉर्चचा वापर करावा. घराच्या बाहेर असलेल्या कोरड्या जागेत ठेवलेले सामान काढताना खातरजमा करून सामानाला हात लावावा. साप दिसला तर अंतर ठेवा.
गोपीनाथ मुंडेअपघात विमा योजना
सर्पदंशावर जवळच्या शासकीय रुग्णालयात तत्काळ उपचार मिळू शकतो. धोका वाढल्यास बड्या रुग्णालयात जाऊन गोपीनाथ मुंडे अपघात विम्याचा लाभ घेऊ शकतो.
विषारी सापांचा धोका मानवी शरीराला जास्त असतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी विषारी आणि बिनविषारी सापांबाबत माहिती घेणे गरजेचे आहे. आपल्या परिसरात साप दिसल्यास अग्निशमन दलाशी किंवा सर्पमित्रांशी संपर्क करावा. एखाद्याला सर्पदंश झाला तर इतरांनी त्याला आधार देऊन रुग्णालयात न्यावे.
- प्रकाश गोयल, सर्पमित्र