सावधान! उल्हासनगर तापाने फणफणले, डेंग्यूचे 26 रूग्ण आढळले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 08:48 PM2018-09-21T20:48:51+5:302018-09-21T20:49:37+5:30
उल्हासनगरात तापाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे कबुली, पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. रिजवानी यांनी दिली. तापाच्या रुग्णाची संख्या दोन महिन्यांत हजारापेक्षा जास्त झाली
उल्हासनगर : शहर तापाने फणफणले असतांना संशयीत 26 डेंग्यूच्या रुग्णांची नोंद आरोग्य विभागात झाली आहे. या 26 रुग्णांपैकी दोन पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी देऊन उपाययोजना सुरू केल्याची माहिती दिली आहे.
उल्हासनगरात तापाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे कबुली, पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. रिजवानी यांनी दिली. तापाच्या रुग्णाची संख्या दोन महिन्यांत हजारापेक्षा जास्त झाली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याचे नमुने, फवारणी, आदींवर जोर देउन नागरिकांत जनजागृती महापालिका आरोग्य केंद्रा मार्फत सुरू असल्याचे ते म्हणाले. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 26 असून बुधवारी रात्री पुन्हा दहावीत असलेल्या एका मुलाला डेंग्यूची लागण झाल्याचे उघड होऊन त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने दरवर्षी फवारणी करण्यात येते. मात्र, यावर्षी फवारणी बंद असून साचलेल्या व नाल्यातील पाण्यात मच्छर ऑइल टाकले जात नसल्याची टीका होत आहे.
कॅम्प नं-4, संभाजी चौक परिसरात राहणारे प्रसिध्द वास्तुविशारद अतुल देशमुख त्यांचा अनिरुद्ध नावाच्या मुलाला 4 दिवसांपासून ताप येत होता. त्याला संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अनिरुद्ध 10 वी मध्ये शिक्षण घेत आहे. याबाबतची माहिती स्थानिक नगरसेवक रमेश चव्हाण यांनी पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजा रिजवानी यांना दिल्यावर त्यांनी संजीवनी रुग्णालयात दाखल असलेल्या अनिरुद्धची भेट घेतली. तसेच त्यांनी शुक्रवारी देशमुख कुटुंब राहत असलेल्या गुरुदत्त सोसायटीतील पाण्याचे नमुने घेऊन, डेंग्यूवर मात करणारी किंबहूना नियंत्रणात आणणारी फवारणीही केली.