विवाहेच्छुकांनी व्हा सावधान; चातुर्मासासह अधिक ज्येष्ठामुळे ५ महिने मुहूर्ताविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 06:49 AM2017-11-03T06:49:06+5:302017-11-03T06:49:47+5:30
तुळशी विवाह नुकतेच उरकले असून आता या दोन महिन्यांत नियोजित असलेल्या विवाहांची लगबग सुरू झाली आहे. तर, अनेकांनी पुढच्या वर्षीच्या दिनदर्शिका विवाह मुहूर्तासाठी चाळायला सुरुवात केली असून विवाह ठरलेल्यांना आणि इच्छुकांना यंदा थोडी घाई करावी लागणार आहे.
- स्नेहा पावसकर
ठाणे : तुळशी विवाह नुकतेच उरकले असून आता या दोन महिन्यांत नियोजित असलेल्या विवाहांची लगबग सुरू झाली आहे. तर, अनेकांनी पुढच्या वर्षीच्या दिनदर्शिका विवाह मुहूर्तासाठी चाळायला सुरुवात केली असून विवाह ठरलेल्यांना आणि इच्छुकांना यंदा थोडी घाई करावी लागणार आहे. कारण, पुढच्या वर्षी अर्थात २०१८ मध्ये अवघे ५२ विवाह मुहूर्त आहेत. यंदाच्या तुलनेत पुढच्या वर्षी तब्बल २० ते २२ मुहूर्त कमी आहेत.
कोणतेही शुभकार्य म्हटले की, सर्वात आधी पाहिला जातो तो मुहूर्त. विवाहासाठी तर अनेकदा आपल्या सोयीनुसार किंवा इतर कारणांमुळे विविध मुहूर्त पाहिले जातात आणि अशा वेळी भरपूर मुहूर्त असतील, तर मग विवाहेच्छुकांची चंगळ होते. परंतु, ते कमी असतील आणि तो साधायचा असेल, तर मात्र झटपट निर्णय घ्यावे लागतात. चालू असलेल्या २०१७ मध्ये सुमारे ७४ विवाह मुहूर्त होते. मात्र, येत्या २०१८ सालात ५२ विवाह मुहूर्त आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक १०, तर त्याखालोखाल मे महिन्यामध्ये ९ मुहूर्त आहेत. फेब्रुवारीमध्ये ८, मार्चमध्ये ७, एप्रिलमध्ये ८, जूनमध्ये ४, जुलैमध्ये ६ असे मुहूर्त आहेत. आॅगस्ट ते नोव्हेंबर या काळात चातुर्मास असल्याने या दरम्यान कोणताही मुहूर्त नाही, अशी माहिती ज्येष्ठ पंचागकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिली. तसेच पौष महिन्यात अर्थात नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात एकही मुहूर्त नाही. तर, पुढील वर्षी अधिक ज्येष्ठ मास येत असून तो १६ मे ते १३ जूनदरम्यान आहे. त्या कालावधीतही एकही विवाह मुहूर्त नाही. अर्थात, याव्यतिरिक्त काही जण आपल्या वेळ आणि सोयीनुसार
मुहूर्त काढतात, असेही त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे सुरू असलेल्या २०१७ या वर्षातील उर्वरित नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांमध्येही मिळून अद्याप १० विवाह मुहूर्त शिल्लक आहेत. त्यामुळे आता कार्तिकी एकादशीनुसार सुरू होणारी लगीनसराई ही या वर्षअखेरपर्यंत चालू राहणार आहे.
महिन्यांनुसार विवाह मुहूर्ताच्या तारखा
फेब्रुवारी - ५, ९, ११, १८,
१९, २०, २१, २४
मार्च- ३, ४, ५, ६, १२, १३,१४
एप्रिल- १९, २०, २४, २५, २६, २७, २८,३०
मे- १,२,४,६,७,८,९,११,१२
जून - १८,२३,२८,२९
जुलै - २,५,६,७,१०,१५
डिसेंबर - २, १३, १७, १८,
२२, २६, २८,२९, ३०,३१