मिठाई घेताना सावधान, बेस्ट बिफोर पाहिले का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:28 AM2021-09-02T05:28:23+5:302021-09-02T05:28:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : आगामी गणेशोत्सव तसेच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिठाईचे पदार्थ खरेदी करण्यापूर्वी मिठाईच्या ट्रेवर बेस्ट बिफोर अर्थात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आगामी गणेशोत्सव तसेच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिठाईचे पदार्थ खरेदी करण्यापूर्वी मिठाईच्या ट्रेवर बेस्ट बिफोर अर्थात खाण्याची मुदत दिली आहे का, हे आधी तपासा, अन्यथा मुदत संपलेली मिठाई घरी आणून तुमच्या आरोग्याला ती घातक ठरू शकते. ठाण्यातील काही दुकानांमध्ये बेस्ट बिफोरची पाटी न लावलेलीच मिठाई सर्रास विकली जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळले आहे.
केंद्रीय नियमानुसार मिठाई विक्रीपूर्वी मिष्टान्न विक्रेत्याने मिठाईच्या ट्रेवर बेस्ट बिफोरची पाटी लावणे आवश्यक आहे. जून २०२० पासून या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार कोणतेही मिष्टान्न कधी उत्पादन झाले आणि ते कधीपर्यंत सेवन करायचे, हे त्या पदार्थांच्या दर्शनी भागात लिहिणे बंधनकारक आहे. तसे नसल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई होऊ शकते.
*वर्षभरात केवळ ११ तपासण्या
ठाणे शहरात गेल्या वर्षभरात ११ दुकानांची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने केली आहे. यातही तपासणीच्या वेळी मिष्टान्नांवर उत्पादन आणि निर्मितीची तारीख असावी, अशा सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
* गोड खा, काळजी घ्या...
कळवा-
कळवा पश्चिमेकडील रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या एका मिठाईच्या दुकानातील मिष्टान्नावर मुदतीच्या तारखेचा उल्लेख नव्हता. अशा नियमाचीही या विक्रेत्याला माहिती नव्हती.
पाचपाखाडी-
येथील एका प्रसिद्ध मिष्टान्न विक्रीच्या दुकानात प्रस्तुत प्रतिनिधीने बुधवारी पाहणी केली. त्यावेळी सर्वच मिठाईच्या ट्रेवर निर्मिती आणि ते सेवन करण्याच्या तारखेचा उल्लेख आढळले.
मानपाडा-
मानपाडा पेट्रोल पंपासमोरील एका प्रसिद्ध दुकानातही कोणत्याही मिष्टान्नावर उत्पादनाची किंवा सेवनाच्या तारखेचा उल्लेख नव्हता.
* औषध प्रशासन अधिकारी-
मिष्टान्न विक्रेत्याने उत्पादनाची आणि ती सेवन करण्याच्या मुदतीच्या तारखेचा उल्लेख करणे बंधनकारक आहे. तसे नसल्यास त्यांना सुधारणा नोटीस पाठवली जाते. नोटीस देऊनही सुधारणा न झाल्यास विक्री परवाना निलंबित केला जातो किंवा २५ हजारांपर्यंतच्या दंडाच्या कारवाईची तरतूद आहे.
धनंजय काडगे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन अधिकारी, ठाणे