ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात दुर्घटना घडू नयेत, यासाठी दक्ष रहा- पालक सचिव सुजाता सौनिक

By सुरेश लोखंडे | Published: June 13, 2024 06:57 PM2024-06-13T18:57:54+5:302024-06-13T18:58:24+5:30

प्रत्येक विभागाने सहभागी होऊन प्रयत्न करावे, असे निर्देश ही त्यांनी यावेळी दिले.

Be vigilant to avoid accidents during monsoons in Thane district Guardian Secretary Sujata Saunik | ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात दुर्घटना घडू नयेत, यासाठी दक्ष रहा- पालक सचिव सुजाता सौनिक

ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात दुर्घटना घडू नयेत, यासाठी दक्ष रहा- पालक सचिव सुजाता सौनिक

सुरेश लोखंडे,  ठाणे :  पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव तथा अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मान्सूनपूर्व कामांचा तसाच पावसाळ्याच्या कालावधीतील  उपाययोजनांचा आढावा घेतला. यंदाच्या पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यात एकही दुर्घटना घडू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी काळजी घ्यावी.  ठाणे जिल्हा हा राज्यात स्वच्छ व हरित व्हावा, यासाठी प्रत्येक विभागाने सहभागी होऊन प्रयत्न करावे, असे निर्देश ही त्यांनी यावेळी दिले.

अपर मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील महसूल, आरोग्य, पोलीस यासह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड, मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर, भिवंडी महापालिका आयुक्त अजय वैद्य, उल्हासनगर महापालिका आयुक्त अजिज शेख, नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त शरद पवार, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी, ठाणे पोलीस सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, उपसंचालक आरोग्य डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

 ठाणे जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या मान्सूनपूर्व तयारीचा श्रीमती सौनिक यांनी आढावा घेतला. यावेळी रस्त्यांवरील खड्डे, धोकादायक इमारती, होर्डिंग, नाले सफाई, आरोग्य सुविधा यांची माहिती घेऊन श्रीमती सौनिक म्हणाल्या की, जिल्ह्यातील होर्डिंगचा आढावा घेऊन धोकादायक, नियमानुसार नसलेली होर्डिंग तातडीने काढून टाकण्याची कार्यवाही करावी. विशेषतः रेल्वे मार्गालगत, रस्त्या लगतच्या होर्डिंगवर विशेष लक्ष ठेवण्यात यावे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व प्रशासनाने धोकादायक इमारतींची माहिती गोळा करून अशा इमारतींमधील रहिवाशांना तात्पुरत्या निवारास्थळी हलवून ती इमारत तातडीने रिकामी करावी. नालेसफाई करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी. 

स्वच्छ, सुंदर व हरित ठाण्यासाठी प्रत्येकाने सहभागी व्हावे
स्वच्छ, सुंदर व हरित ठाणे साठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश देऊन श्रीमती सौनिक  म्हणाल्या की, राज्य इनोव्हेशन सोसायटीच्या मार्फत अनेक स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यात येते. अशा स्टार्टअपची मदत घेऊन ठाणे जिल्हा हा स्वच्छ, सुंदर व हरित करून राज्यात आघाडीवर असावा, यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता यावे, असे रस्ते असावेत. तसेच रस्त्यांच्या कडेला शोभेच्या झाडांऐवजी सावली देणारी झाडे लावण्यात यावीत. झाडांवरील लाईटिंग तातडीने काढून टाकण्यात यावीत. पावसाळ्यात झाडे पडून अपघात होतात. ते टाळण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने नियमितपणे वृक्ष छाटणी होईल, याची दक्षता घ्यावी. रस्त्यांची सफाई योग्य रितीने होईल याकडे लक्ष द्यावे. तसेच सफाई कर्मचाऱ्यांची उपस्थिती डिजिटल स्वरुपात करावी. पाणी साचणाऱ्या सकल भागाची तातडीने माहिती मिळण्यासाठी त्या ठिकाणी सेन्सरचा वापर करावा. तसेच पाणी साचत असल्यास त्यासंबंधीची माहिती नागरिकांपर्यंत वेळेत पोहचविण्यासाठी यंत्रणा तयार ठेवावी. 

नियंत्रण कक्ष 24 तास सुरू ठेवा
पावसाळ्याच्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाचे नियंत्रण कक्ष अव्याहतपणे सुरू ठेवावे. या ठिकाणी प्रत्येक विभागाचा कर्मचारी असेल याची दक्षता घ्यावी. नियंत्रण कक्षात जमा होणाऱ्या माहितीचा वापर सुयोग्यपणे करण्यासाठी एआय व मशिन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच पोलीस विभागाचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असतील याची दक्षता घ्यावी. आणखी सीसीटीव्हीची आवश्यकता असल्यास जिल्हा नियोजनकडून निधीसाठी प्रस्ताव पाठवावे. रस्ते सुरक्षेसाठी महामार्गावरील धोकादायक स्थळांची माहिती घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरण, महापालिकेच्या सहाय्याने योग्य उपाययोजना करावे, अशा सूचनाही श्रीमती सौनिक यांनी यावेळी दिल्या.

ठाणे जिल्ह्यात ई ऑफिसचा प्रभावी वापर करावा
प्रशासनाचे काम जलदगतीने होण्यासाठी राज्य शासनाने ई ऑफिस प्रणालीचा वापर सुरू केला आहे. ठाणे जिल्हा प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी कार्यालयीन नस्ती, पत्रव्यवहारासाठी ई ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर करावा. राज्यात ई ऑफिस प्रणालीचा शंभर टक्के वापर करणारा ठाणे जिल्हा व्हावा, यासाठी सर्वच विभागाने प्रयत्न करावे, असे आवाहनही श्रीमती सौनिक यांनी यावेळी केले. 
जिल्हाधिकारी श्री. शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त श्री. राव यांच्यासह इतर विभाग प्रमुखांनी पावसाळी कालावधीसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.


आपत्तीकाळात मदतीसाठी जिल्ह्यात यंत्रणांनी सज्जता केली आहे. जिल्ह्यातील 500 तरुणांना आपदामित्र म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती श्री. शिनगारे यांनी यावेळी दिली.  तत्पूर्वी जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी श्रीमती सौनिक यांचे स्वागत केले.

Web Title: Be vigilant to avoid accidents during monsoons in Thane district Guardian Secretary Sujata Saunik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे