वाढीव पाण्यासाठी बारवी धरणावर मदार
By admin | Published: November 17, 2015 12:52 AM2015-11-17T00:52:26+5:302015-11-17T00:52:26+5:30
यंदा धरणक्षेत्रात पाऊस कमी झाल्याने सर्वाधिक पाणीकपातीचे संकट ठाणे जिल्ह्यावर ओढावले आहे. पाणी संकटाचा मुकाबला करण्याकरिता लागलीच धरणाची बांधणी अशक्य
- पंकज पाटील, अंबरनाथ
यंदा धरणक्षेत्रात पाऊस कमी झाल्याने सर्वाधिक पाणीकपातीचे संकट ठाणे जिल्ह्यावर ओढावले आहे. पाणी संकटाचा मुकाबला करण्याकरिता लागलीच धरणाची बांधणी अशक्य असल्याने बारवी धरणाची उंची वाढल्याने निर्माण झालेल्या अतिरिक्त पाणी साठ्यावर आरक्षण सांगण्याची धडपड जिल्ह्यातील सर्व शहरांनी सुरु केली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) राज्यातील पहिले धरण म्हणजे अंबरनाथचे बारवी धरण. औद्योगिक क्षेत्रांना पाणी पुरवठा करण्यासाठी हे धरण १९७२ मध्ये बांधून पूर्ण करण्यात आले. त्यानंतर १९८६ आणि पुन्हा १९९८ मध्ये या धरणाची उंची वाढविण्यात आली. ६५.१५ मीटर उंचीच्या या धरणात १७२ दशलक्ष घन मीटर एवढा पाणीसाठा करण्याची क्षमता होती. आता अलीकडेच धरणाची उंची ९ मीटर वाढविल्याने हीच क्षमता दुप्पट झाली. आता धरणात ३४०.४८ दशलक्ष घन मीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. धरणाची उंची वाढीसोबत आता धरणातील ११ स्वयंचलीत दरवाजांचे कामही सुरु करण्यात आले आहे. मात्र धरणाची उंची वाढल्याने बाधित होणाऱ्या गावांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पुनर्वसनासोबत धरणग्रस्तांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याची मागणी जोर धरत आहे. ही मागणी एमआयडीसी एकटी पूर्ण करू शकत नसल्याने आता या धरणातून ज्या महापालिका आणि नगरपरिषदांना पाण्याची गरज भासणार आहे अशा महापालिका आणि नगरपरिषदांनी येथील धरणग्रस्तांना नोकरी उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्ताव पुढे येत आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक महापािलका क्षेत्रांचा आणि नगरपरिषदेचा विस्तार वाढत असल्याने शहराची पाण्याची तहान भागविण्यासाठी या पालिका बारवी धरणाच्या वाढीव पाणीसाठ्याच्या आरक्षणाकरिता सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
जिल्ह्याला वाढीव पाणीसाठा उपलब्ध करुन देण्यासाठी अद्याप एकाही धरणाचे काम सुरु झालेले नाही. वाढीव पाण्यासाठी जिल्ह्याला उल्हासनदी आणि बारवी धरणावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. उल्हासनदीवरील पाण्याचे आरक्षण आधीच पूर्ण झालेले असल्याने आता बारवीच्या वाढलेल्या उंचीतून जो अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार आहे त्यावरच जिल्ह्याची तहान भागविली जाणार आहे.