पुनर्विकासासाठी चाळीतील घर खाली न करणाऱ्या वृद्धाला मारहाण: दगडाने केला हल्ला
By जितेंद्र कालेकर | Published: October 22, 2023 06:13 PM2023-10-22T18:13:22+5:302023-10-22T18:13:33+5:30
कळवा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
ठाणे: चाळीतील घर खाली करण्यासाठी धमकी देत गोविंद नवले (७५) या वृद्धाला जबर मारहाण करीत दगडाने प्रहार करणाऱ्या संदेश गिरकर (३६) आणि प्रशांत गिरकर (४५) या दोन भावांविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गोविंद यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
कळव्यातील खारेगाव येथील रहिवाशी शेखर नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे कुटूंबीय खारेगाव येथील विठ्ठल साेसायटी चाळीत वास्तव्याला आहे. या चाळीचा सचिन पाटील या विकासकाकडून पुनर्विकास होणार आहे. परंतू, या इमारतीचे अनधिकृत बांधकाम होणार असल्याचा नवले कुटूंबीयांचा आराेप असून अशा बांधकामासाठी त्यांचा विरोध आहे. असे असतांना या चाळीतील ४० पैकी ३९ रहिवाशांनी विकासकाला अनुमती देखिल दिली आहे.
केवळ नवले यांचे घर खाली होणे बाकी असल्यामुळे या कुटूंबावर काही रहिवाशांकडून दबाव आणला जात आहे. २२ ऑक्टाेबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास संदेश आणि प्रशांत गिरकर या दोन्ही भावांनी नवले यांच्या घराला धक्का पोहचेल, अशा तऱ्हेने स्वत:च्या घराच्या खिडक्या काढण्याचा प्रयत्न केला. या खिडक्या काढल्या तर आमच्या घराचे बांधकाम कमकुवत होत असल्याचे सांगत या खिडक्या तोडण्याला गोविंद नवले यांनी आक्षेप घेतला.
तसेच त्यांनी विकासक सचिन पाटील यांनाही हा प्रकार कळविला. त्यावर तुम्ही घरातून निघत नाही ना? तुम्ही कसे निघत नाहीत ते बघताे? असे म्हणत गिरकर यांनी नवले यांना मारहाण केली. तसेच दगडानेही त्यांच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात आले. आमचा पुनर्विकासाला विरोध नसून अनधिकृत बांधकामाला विरोध आहे. या हल्ल्यामागे विकासकाचाही हात असण्याची शक्यता असल्याचा आरोप गोविंद नवले यांचा मुलगा शेखर नवले यांनी केला आहे.