आव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाण: कोरोनाग्रस्त आरोपींच्या संपर्कातील ठाण्याच्या २२ पोलिसांचा ‘हायरिस्क’मध्ये समावेश
By जितेंद्र कालेकर | Published: April 15, 2020 09:25 AM2020-04-15T09:25:01+5:302020-04-15T09:25:02+5:30
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्याच्या आवारात फेसबुकवरील वादग्रस्त पोस्ट केल्यावरुन एका अभियंत्याला मारहाणीचा प्रकार घडला होता. यामध्ये सहा आरोपींना अटक झाली होती. या सहापैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील तब्बल २२ पोलिसांचा हायरिस्कमध्ये समावेश झाला असून त्यांना आता विलगीकरणामध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
जितेंद्र कालेकर
ठाणे: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यावर एका अभियंत्याला मारहाण प्रकरणात अटकेत असलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या सुमारे २२ पोलीस कर्मचाऱ्यांनाही विलगीकरणात ठेवले आहे. आता ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात विलगीकरणातील पोलिसांची संख्या ५१ वर पोहचली आहे.
आव्हाड यांच्या ठाण्यातील विवियाना मॉलसमोरील बंगल्याच्या आवारात ५ एप्रिल रोजी रात्री अनंत करमुसे या अभियंत्याला मारहाणीचा प्रकार घडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्याने वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आधी पाच जणांना तर नंतर एकाला अशा सहा जणांना अटक केली. या सहापैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. मुंब्रा भागातील काही जणांना कोरोनाची लागण झाली, त्याचवेळी त्याभागात आव्हाड यांच्यासमवेत गेलेल्या सर्वांची कोरोनाची तपासणी आरोग्य विभागाने केली होती. त्यामध्ये आव्हाड यांच्यासमवेत असलेल्या दोन पोलीस सुरक्षा रक्षकांसह १४ जणांचीही चाचणी पॉझिटिव्ह आली. त्याच १४ जणांमध्ये वरील प्रकरणातील दोन आरोपींचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांचे जबाब नोंदविणे, त्यांना न्यायालयात नेणे, त्यांची वैद्यकीय तपासणी करणे, घटनास्थळाचा पंचनामा करणे, स्कॉर्पिओ आणि त्यांनी वापरलेल्या लाकडी काठया जप्त करणे या संपूर्ण प्रक्रीयेमध्ये वर्तकनगर पोलीस ठाण्याचे २२ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. दोन आरोपींची तपासणी कोरोना पॉझिटिव्ह आली. त्यांच्या चौकशीमध्ये असलेले हे सर्वच पोलीस त्यांच्या संपर्कामध्ये आल्यामुळे पोलिसांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
* दरम्यान, वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या या सर्व २२ पोलीस कर्मचाºयांची मंगळवारी कॅडबरी उड्डाण पूलाखाली असलेल्या केंद्रामध्ये कोरोनाची तपासणी करण्यात आली. या सर्वांनाच आता विलगीकरणात ठेवले आहे. त्यापूर्वी, मुंब्रा पोलीस ठाण्यातील ३२ पोलीस कर्मचा-यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यातील तिघांचे अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आले. त्यांना विलगीकरण कक्षातून थेट रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यामुळे वर्तकनगरचे २२ आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे २९ अशा ५१ पोलिसांवर विलगीकरणात राहण्याची आफत ओढवली आहे. यातील काहींना घरात तर काहींना विलगीकरण केंद्रामध्येच विलग रहावे लागणार आहे. त्यामुळे नाक्यावरील बंदोबस्ताच्या ठिकाणी कर्मचाºयांची नियुक्ती कशी करायची असाही प्रश्न आता वरिष्ठ पोलीस अधिका-यांसमोर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.