निवासी डॉक्टरला मारहाण करणे पडले महागात, वरिष्ठ डॉक्टर ३० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर
By अजित मांडके | Published: January 6, 2024 05:17 PM2024-01-06T17:17:51+5:302024-01-06T17:18:32+5:30
राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात पदवी पूर्ण करणारे विद्यार्थी एक वर्षाच्या करारावर कळवा रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून काम करतात.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका वरिष्ठ डॉक्टरने निवासी डॉक्टरला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या घटनेची देखल घेत, पालिका आयुक्तांनी तत्काळ अहवाल तयार करण्याचे आदेश रुग्णालयाच्या डीन ला दिले होते. त्या अहवालानुसार पालिका प्रशासनाने वरिष्ठ डॉक्टरला३० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. त्याच्या पदभार इतर वरिष्ठ डॉक्टरकडे देण्यात आला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. त्यामुळे निवासी डॉक्टरला मारहाण करणे वरिष्ठ डॉक्टरला चांगलेच भोवले असल्याचे दिसून आले.
रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांकडून सौजन्याने वागणूक मिळावी, यासाठी उपाययोजना देखील आखल्या आहेत. तसेच रुग्णालयाच्या स्वच्छतेवर भर देखील दिला आहे. त्यातून रुग्णालयाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीत असताना, शुक्रवारी पुन्हा एकदा रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्न उभा राहीला आहे.
राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात पदवी पूर्ण करणारे विद्यार्थी एक वर्षाच्या करारावर कळवा रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून काम करतात. रुग्णालयातील बाह्य रुग्ण कक्षापासून ते अनेक कक्षांची जबाबदारी त्यांच्यावर असते. अशाप्रकारे रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील शस्त्रक्रिया विभागात दोन निवासी डॉक्टर शुक्रवारी सेवा बजावत होते. त्यावेळी रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यावरून त्यांचे वरिष्ठ डॉक्टर संजय बर्नवाल यांच्याशी वाद झाला. यातून डॉ. बर्नवाल यांनी त्यांना शिवीगाळ करत त्यातील एकाला मारहाण केल्याची घटना समोर आली. या घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्त यांनी रुग्णालयाचे डीन यांना प्राथमिक अहवाल तत्काळ पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता अहवाल प्राप्त झाल्यानंतर डॉक्टर संजय बर्नवाल यांना ३० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता, दुसऱ्या वरिष्ठ डॉक्टरांकडे पदभार देण्यात आला असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.