पोलिसासह पत्नीला मारहाण; भाजप कार्यकर्त्यासह आठ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 01:53 PM2023-11-19T13:53:14+5:302023-11-19T13:53:37+5:30
बोरिवली पोलिस ठाण्यात हवालदार असलेले प्रदीपकुमार बाबर हे कुटुंबासह मीरा रोडच्या हाटकेश भागातील राज एक्झॉटिका या इमारतीत राहतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा रोडमध्ये एका सोसायटीत राहणाऱ्या भाजप कार्यकर्ता व त्याच्या कुटुंबीयाने मुंबई पोलिस दलातील पोलिसासह त्याच्या पत्नीस मारहाण केली. स्वत:ला बाहुबली म्हणवून घेणाऱ्या अमित सिंह या भाजप कार्यकर्त्यासह एकूण आठ जणांवर काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बोरिवली पोलिस ठाण्यात हवालदार असलेले प्रदीपकुमार बाबर हे कुटुंबासह मीरा रोडच्या हाटकेश भागातील राज एक्झॉटिका या इमारतीत राहतात. बुधवार, १५ नोव्हेंबरच्या रात्री नऊच्या सुमारास बाबर हे ड्यूटी करून घरी जाण्यासाठी इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ आले असता अमित सिंह हा त्यांच्याकडे रागाने पाहू लागला. रागाने का पाहतो, असे विचारले असता अमित याने धमकी देत भाऊ अभिजित उर्फ घोडा याला कॉल करून येण्यास सांगितले. काही वेळातच अभिजितसह त्याचे वडील सुरेंद्र, आई सरिता, पत्नी कोमल, सोनू अभिजित सिंह, सुरेंद्र यांचा चालक व एक अनोळखी असे धावून आले आणि मारहाण सुरू केली.
रहिवासी करताहेत कारवाईची मागणी
रहिवाशांच्या सांगण्यानुसार, १८० सदनिका असलेल्या या सोसायटीत गेल्या चार वर्षांपासून सिंह कुटुंबीयांनी दादागिरी चालवली आहे. सुरेंद्र सिंह हे सोसायटीचे अध्यक्ष असताना मनमानी व गैरकारभाराबद्दल रहिवाशांनी गृहनिर्माण संस्था निबंधक यांच्याकडे तक्रार केल्या. त्यामुळे सुरेंद्र यांना पदावरून हटवले. गैरप्रकाराबद्दल कारवाईची मागणी रहिवासी करीत आहेत.
स्वत:ला बाहुबली म्हणत फलकबाजी
अमित सिंह याने स्वत:ला बाहुबली म्हणवत भारतीय जनता पार्टीचा फलक सोसायटीच्या आवारात लावला आहे. राजकीय पक्षाचा फलक काढून टाकण्याचे सांगून पण सिंह सोसायटीला जुमानत नाही. अशा कारणांमुळे रहिवाशांना जाणीवपूर्वक टोमणे, दादागिरी, मारहाण करणे आदी प्रकार अमित सिंह व कुटुंबीयांकडून होतात, असे रहिवाशांनी सांगितले.