ठाण्यातील तलावांचे सुशोभीकरण
By admin | Published: June 20, 2017 06:26 AM2017-06-20T06:26:05+5:302017-06-20T06:26:05+5:30
शहरातील तलावांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत लोकमतमध्ये ‘काहीतरी कर ठाणेकर’, या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पालिकेने या तलावांच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेऊन
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शहरातील तलावांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत लोकमतमध्ये ‘काहीतरी कर ठाणेकर’, या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पालिकेने या तलावांच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेऊन तसा आराखडाही तयार केला होता. आता प्रत्यक्षात तो मूर्त स्वरूपात येणार असून यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. यामध्ये मासुंदा तलावाबरोबरच कौसा, खारेगाव, न्यू शिवाजीनगर (कळवा), कचराळी, मखमली, फडकेपाडा या तलावांचे सुशोभीकरण आणि निगा देखभालीसाठी भाडेतत्त्वावर दिले जाणार आहेत.
शहरात आजघडीला ३५ तलाव आहेत. यातील हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच तलाव चांगल्या स्थितीत आहेत. परंतु, उर्वरित तलावांची अवस्था फारच दयनीय झाली आहे. काही महिन्यांपूर्वी लोकमतने काहीतरी कर ठाणेकरच्या माध्यमातून तलावांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत वाचा फोडली होती. तसेच कचराळी तलावाबाबतदेखील वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कचराळी तलावाचे अवघे १५ दिवसांत रूपडे पालटले होते. तसेच उर्वरित तलावांचा कायापालट करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे कामही सुरू केल्याचे स्पष्ट केले होते.
आता टप्प्याटप्प्यांनी शहरातील तलावांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार, मासुंदा तलावाच्या ठिकाणी १५ वर्षे कराराच्या कालावधीवर या भागात १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, फूड कोर्ट उभारणे, साउंड प्रकारचा कारंजा उभारणे, लहान मुलांसाठी चिल्डेन प्ले एरिया तयार करणे, पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवणे, बोटिंग आणि मासेमारी अशा प्रकारे निगा देखभालदेखील खाजगी ठेकेदाराला दिली जाणार आहे.