गरीब-गरजूंसाठी ‘ब्युटीफुल’ संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 02:15 AM2018-06-17T02:15:37+5:302018-06-17T02:15:37+5:30
घरकामगार महिलांच्या मुलींनीही घरकामच न करता त्यांनीही मेहंदी, ब्युटीपार्लर, शिवणक्लास अशा व्यवसायाच्या विविध वाटा निवडाव्या, या उद्देशाने त्यांना मार्गदर्शन करण्याचा आणि हे विविध कोर्स विनामूल्य शिकवण्याचा संकल्प केला आहे, तो प्रियंका तलांडे, निशंका ढाले आणि प्रियंका सुर्वे या तीन सर्वसामान्य कुटुंबातील ठाणेकर तरुणींनी.
स्नेहा पावसकर
ठाणे : घरकामगार महिलांच्या मुलींनीही घरकामच न करता त्यांनीही मेहंदी, ब्युटीपार्लर, शिवणक्लास अशा व्यवसायाच्या विविध वाटा निवडाव्या, या उद्देशाने त्यांना मार्गदर्शन करण्याचा आणि हे विविध कोर्स विनामूल्य शिकवण्याचा संकल्प केला आहे, तो प्रियंका तलांडे, निशंका ढाले आणि प्रियंका सुर्वे या तीन सर्वसामान्य कुटुंबातील ठाणेकर तरुणींनी.
आपली आई घरकाम करते आणि पुढे जाऊन तिच्याप्रमाणेच आपणही नकळतपणे या घरकामात अडकले जाऊ नये, या उद्देशाने निशंका हिने त्याकाळी ब्युटीपार्लरचा कोर्स केला. पार्लरमध्ये नोकरी केल्यावर कालांतराने तिने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. मात्र, इतरही घरकामगार महिलांच्या तसेच गरीब-गरजू मुलींच्या वाट्यालाही घरकामच येऊ नये आणि यासाठी आपण समाजाप्रति काही योगदान देण्याचे निशंका हिने निश्चित केले. तिने प्रियंका सुर्वे आणि प्रियंका तलांडे या आपल्या दोन मैत्रिणींना ही कल्पना सांगितली आणि त्या दोघीही तिच्या कामात आनंदाने सहभागी झाल्या. या तिघींनी कलाकौशल्य फाउंडेशनच्या माध्यमातून झोपडपट्टी परिसरातील महिलांना ब्युटीपार्लरचा बेसिक तसेच अॅडव्हान्स कोर्स मोफत शिकवण्याचे ठरवले. साधारण आॅक्टोबर २०१७ पासून त्यांनी या कोर्सचे प्रशिक्षण देणे सुरू केले. या तिघींनी आतापर्यंत ठाण्यातील समतानगर, किंगकाँगनगर, तुर्फापाडा येथील सुमारे ४० जणींना प्रशिक्षण दिले आहे. त्यात्या प्रभागातील इच्छुक महिलांचे १० जणींचे गट करून त्यातील एखाद्या महिलेच्या घरी त्या प्रशिक्षण देतात. आठवड्यातून साधारण तीन वेळा याप्रमाणे त्या तीन महिने प्रशिक्षण देतात. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना फाउंडेशनतर्फे प्रशस्तीपत्रकही दिले जाते. सुमारे १४ वर्षांपासून ते ३५ वर्षांपर्यंतच्या महिला सहभागी झाल्या होत्या. येत्या काळात महिलांच्या प्रतिसादानुसार ठाण्यातील इतरही चाळवस्तींमध्ये आपण कोर्सचे प्रशिक्षण देणार असल्याचे निशंका यांनी सांगितले. आमच्याकडे असलेली कला आणि त्याचे प्रशिक्षण आम्ही गरीब घरांतील मुली-महिलांना देऊ शकत आहोत, याचा आम्हाला आनंद असून त्यातून त्या स्वावलंबी बनाव्यात, हीच आमची इच्छा असल्याचे प्रियंका यांनी सांगितले.